बारीपाडाचे चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर; ३ मार्चला चंद्रपूर येथे पुरस्कार वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 11:57 PM2024-02-27T23:57:41+5:302024-02-27T23:58:38+5:30
ताडोबा महोत्सवात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे
पिंपळनेर - वन, तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बारीपाडा (ता. साक्री, जि. धुळे) येथील कार्यकर्ते चैत्राम पवार यांना राज्य शासनाचा २०२४ या वर्षाचा महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि वीस लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. चंद्रपूर येथे ३ मार्च २४ रोजी होणाऱ्या ताडोबा महोत्सवात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.
नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, सक्षमीकरण, स्वावलंबन, वनहक्क कायदा, कृषि विकास आणि शाश्वत विकास यावर गेल्या मागील २६ वर्षापासून चैत्राम पवार हे आदिवासी समाजासोबत काम करीत आहेत. वनवासी कल्याण आश्रमाच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरातमधील जवळपास १०० गावांमध्ये त्यांच्या कामाचा विस्तार केला आहे. सध्या पवार हे मराठवाडा आणि खान्देश भागासाठी या वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांचे स्वागत केले.
प्रतिक्रिया
हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनी या पुरस्कारासाठी नाव सुचविले होते. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून राज्यात वन व जलसंवर्धनाचे काम करतो. त्याचीच ही पावती मिळाली. यात ग्रामस्थांचेही मोठे योगदान आहे.
चैत्राम पवार, बारीपाडा.