धुळे बाजार समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम
By अतुल जोशी | Published: April 30, 2023 07:12 PM2023-04-30T19:12:56+5:302023-04-30T19:13:42+5:30
भाजपचे खासदार डॉ. भामरे प्रणित पॅनलला अवघ्या दोन जागा
धुळे: अत्यंत चुरशीच्या झालेल्या धुळे बाजार समितीच्या निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने खासदार डॅा. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा साफ धुव्वा उडवून बाजार समितीवर वर्चस्व कायम राखले आहे. महाविकास आघाडीला १८ पैकी १६ जागा मिळाल्या असून, बाजार समितीवर त्यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. तर भाजप प्रणित पॅनलला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
धुळे बाजार समितीवर गेल्या ४० वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. ही सत्ता परिवर्तन करण्यासाठी खासदार डॅा. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप व बोरकुंडचे पहिले लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या गटाने पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मतदार कोणाला कौल देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मतदानापूर्वी भाजप व महाविकास आघाडीचे प्रत्येकी एक-एक उमेदवार बिनविरोध झाल्याने, १६ जागांसाठी मतदान झाले होते.
अखेर रविवारी जाहीर झालेल्या निकालात महाविकास आघाडीने भाजप प्रणित पॅनलचा धुव्वा उडवला. मतदानातून १५ व एक बिनविरोध अशा एकूण १६ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळविला. भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. बाजार समितीत वर्चस्व राखण्यात आमदार कुणाल पाटील यांना पुन्हा एकदा यश मिळाले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"