राईनपाडा घटनेतील मुख्य संशयित महारू पवार यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:39 PM2018-07-05T13:39:54+5:302018-07-05T13:41:15+5:30
अटकेतील आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार, मुदतवाढीच्या मागणीची शक्यता
आॅनलाइन लोकमत
धुळे : राईनपाडा (ता. साक्री) येथील पाच भिक्षुकांच्या हत्येप्रकरणी १२ मुख्य संशयित आरोपींपैकी महारू वनक्या पवार (२२) यास पोलिसांनी बुधवारी रात्री नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथून अटक केली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या २४ झाली आहे. दरम्यान यापूर्वी अटक केलेल्या २३ संशयितांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपत असून पुन्हा पोलीस कोठडीच्या मागणीची शक्यता आहे.
फरार आरोपींना आश्रय देणाºयांनाही आरोपी करण्यात येणार असल्याने या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढणार आहे. अद्याप अन्य संशयित फरार आहेत. त्यात ११ मुख्य संशयित आरोपींचाही समावेश असून त्यांच्या शोधासाठी पाच पथके यापूर्वीच नजीकच्या जिल्ह्यांसह गुजरात, मध्यप्रदेश राज्यात पाठविली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सध्या अटकेत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडीची मुदत वाढवून देण्याची मागणी होऊ शकते.
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे व सहकाºयांनी मुख्य संशयित महारू पवार यास विसरवाडी येथील त्याच्या चुलत मावशीच्या घरून अटक केली. त्यास आज दुपारी चार वाजता कोर्टासमोर हजर केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संशयितांचा कबुलीजवाब
अटकेतील २३ संशयित आरोपींची बुधवारी साक्री येथे ग्रामीण रूग्णालयात पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. आज त्यांचा कबुली जवाब नोंदविण्यात येत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
या गुन्ह्याचा तपास साक्री विभागाचे उपअधीक्षक तथा तपास अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्याकडे असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिवाणसिंग वसावे हेही समांतर पद्धतीने तपासात मदत करत आहेत.