संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:04 PM2019-09-17T23:04:46+5:302019-09-17T23:05:04+5:30
बभळाज : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा हजेरी, नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी
बभळाज : परिसरात एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली असून मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटासह १ तास मुसळधार पाऊस कोसळला. येथील श्री नागेश्वर मंदिराच्या परिसरात वीज कोसळल्याची चर्चा आहे. मात्र, कोणतेही नुकसान झालेले नाही.
१६ रोजी पूर्ण दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी आंतर मशागतीची कामे उरकून घ्यायला सुरुवात केली होती. मंगळवारी सकाळीही निरभ्र वातावरण व उन्ह पडल्याने कापसावर फवारणी, निंदणी, अशी कामे सुरु झाली होती. मात्र, दुपारी एक वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सगळी कामे बंद करुन शेतकरी परतले. यापुढील तीन चार दिवस कोरड मिळाली तरी शेतात काम करता येणार नाही व वाफसाही मिळणार नाही.
पिके झाली खराब
ज्वारी, बाजरी ही पिके पक्व झाली आहेत तर काही शेतात दाणा भरणीवर आहेत. पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने पिके खराब झाली आहेत तर कापसाची पक्की झालेली बोंडे सडायला लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून ओल्या दुष्काळाची भिती व्यक्त होत आहे. टमाट्याचेही मोठे नुकसान झाले आहे.
पंचनाम्याची मागणी
खराब झालेल्या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. मागील तीन वर्षात कमी पावसामुळे अपेक्षित उत्पन्न आले नाही. म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. यावर्षी जास्त पावसामुळे पिके नष्ट होत आहेत. हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला जात असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. नेते प्रचारात तर प्रशासन तयारीत गुंतले असल्याने शेतकºयांना वाºयावर सोडल्याची भावना व्यक्त होत आहे. शेतकºयांच्या नुकसानग्रस्त पिकांचा त्वरित पंचनामा करुन विमा कंपनीकडून अथवा शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. हवालदिल झालेल्या शेतकºयाला मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.