मालेगावचा पाकीटमार धुळ्यात सापडला; १५ हजार पोलिसांनी केले हस्तगत
By देवेंद्र पाठक | Published: April 27, 2023 07:10 PM2023-04-27T19:10:48+5:302023-04-27T19:10:53+5:30
आग्रा रोडवरील मिरवणुकीत घडला होता प्रकार
धुळे - आग्रा रोडवरून निघालेल्या जैन समाजाच्या मिरवणुकीत एकाच्या खिशातून पाकीट चोरट्याने लांबविले. त्यात २० हजारांची रोकड होती. ही घटना बुधवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी सायंकाळी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात चोरट्याला पकडण्यात यश मिळाले. त्याच्याकडून २० हजारपैकी १५ हजार परत मिळविण्यात यश आले. अबुबकर मोहम्मद उस्मान (वय ३८, रा. मालेगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
जैन बांधवांची दीक्षा मिरवणूक बुधवारी सकाळी आग्रा रोडवरून सुरू होती. आग्रा रोडवरील क्रांती ज्वेलर्सजवळ चोरट्याने आशिष अजित कुचेरिया यांच्या पॅन्टच्या खिशात हात टाकून २० हजार रुपयांची रोख रक्कम असलेले पाकीट चोरले आणि क्षणात पळ काढला. ही प्रकार सुरू असताना चोरी होत असल्याची बाब आशिष कुचेरिया यांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केला. पण, गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पळ काढला. याप्रकरणी लागलीच आशिष कुचेरिया यांनी आझादनगर पोलिसात फिर्याद दाखल केली.
गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरविली. चोरट्याचे वर्णन आणि इतर माहिती मिळवून तपासाला सुरुवात केली. माहितीनुसार संशयित तरुण चाळीसगाव चौफुलीवर असल्याची गोपनीय माहिती मिळताच प्रमोद पाटील यांनी पथकासह धाव घेतली. या ठिकाणाहून अबुबकर मोहम्मद उस्मान (वय ३८, रा. मालेगाव) याला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मिरवणुकीत चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीतील १५ हजारांची रोकड पोलिसांनी काढून दिली. त्याच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.