तब्बल दोन हजार बाधित रुग्ण उपचाराअंती घरी परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:30 AM2021-05-03T04:30:28+5:302021-05-03T04:30:28+5:30
धुळे: गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्यासाठी शहरातील जिल्हा ...
धुळे: गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध होण्यासाठी शहरातील जिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. योग्य वैद्यकीय उपचारामुळे आतापर्यंत तब्बल १हजार आठशे कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत, अशी माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक वर्ग- १ स्त्री रुग्णालय व कोविड सेंटर प्रमुख डॉ. अश्विनी भामरे यांनी दिली. येथील कोविड सेंटरमध्ये शुक्रवारी रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसह सफाई कामगारांचे आभार व्यक्त करीत सत्कार केला.
यावेळी रुग्णाचे नातेवाईक जयराज जयसिंग पाटील यांची रुग्णालयास धन्वंतरी मातेची प्रतिमा भेट दिली. कार्यक्रमात बोलताना डॉ. आश्वनी भामरे म्हणाल्या की, जिल्हा रुग्णालयातील चार वाॅर्डमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. गंभीर रुग्णांसाठी पहिल्या दोन वाॅर्डात महिला व पुरुष रुग्णांची व्यवस्था केली आहे. शुक्रवारी सात बाधित रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण १ हजार आठशे बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच मास्क वापरा व सोशल डिस्टन्स पाळावे व कोरोनाची बाधा झालीच तर घाबरून न जाता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य तो उपचार लवकरात लवकर सुरू करावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षिका डॉ.भामरे यांनी केले. यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महेश भडांगे, डॉ.मगर, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. राजे, कर्मचारी सागर लगोटे, सचिन कुवर, अमोल सोनार, अजय पाटील आदींचा सत्कार जयराज पाटील, पुष्पा पाटील, सुरेखा पाटील, प्रसाद पाटील, अक्षदा पाटील यांनी केला.