गुरूमुळे अनेक गोष्टी साध्य होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:18 AM2019-07-16T11:18:58+5:302019-07-16T11:19:18+5:30
वेण्णा भारती : समर्थ वाग्देवता मंदिरास दिली सदिच्छा भेट
आॅनलाइन लोकमत
धुळे : गुरु व शिष्य यांचे नाते अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे आहे. गुरूमुळे आपल्याला जीवनातील अनेक गोष्टी साध्य करता येतात तसेच कृतार्थ जीवन जगण्यासाठी गुरूचे महत्व आपल्या जीवनात असते, असे प्रतिपादन नाशिक येथील श्रीकपिलेश्वर सिद्ध पिठमचे १००८ महंत परमपूज्य वेण्णा भारती यांनी केले.
पू.वेण्णा भारती यांचे गुरूपौर्णिमेनिमित्त शहरात प्रवचनाचे कार्यक्रम होणार असल्याने, त्या शहरात आल्या आहेत. गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला त्यांनी मालेगाव रोड येथील समर्थ वाग्देवता मंदिरात भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.
परमपूज्य वेण्णा भारती यांनी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मंदिराचे कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे व पदाधिकारी उपस्थित होते.
समर्थ रामदास स्वामी व त्यांच्या शिष्यांचे लिखित स्वरूपात असलेले साहित्य समर्थ वाग्देवता मंदिरात कै. नानासाहेब शंकर देव यांनी आणले व आजतागायत या साहित्याचे जतन संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. या अध्यात्मिक साहित्याचा अभ्यास येथे येणाऱ्या अभ्यासकांना येणाºया काळात निश्चितच होईल असा आशावाददेखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या ठिकाणच्या दुर्मिळ साहित्याची पाहणी देखील त्यांनी केली. मंदिराच्यावतीने वेण्णा भारती महाराज यांचा सुंदर कांड देऊन कार्याध्यक्ष देवेंद्र डोंगरे यांनी सन्मान केला.