मराठा क्रांती मोर्चाच्या १६ जणांचे आत्मसमर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 11:54 AM2018-08-08T11:54:57+5:302018-08-08T11:56:36+5:30
वाहन तोडफोड प्रकरण : पोलिसांचा बंदोबस्त कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : खासदार डॉ़ हिना गावीत यांच्या वाहनावर हल्ला करणाºया मराठा क्रांती मोर्चाच्या ४ जणांना अटक केल्यानंतर मनोज मोरेंसह १६ जणांनी शहर पोलीस स्टेशनला बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आत्मसमर्पण केले़ यावेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही़ दरम्यान, यापुर्वी ४ जण पोलिसांच्या ताब्यात असल्याने २० जणांचा समावेश आहे़
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपल्यानंतर बाहेर निघत असताना प्रवेशद्वाराजवळच त्यांची कार अडविण्यात आली होती़ कारची तोडफोड केल्यानंतर याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता़ मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक अमोल भागवत, अमोल चव्हाण, दिनेश उर्फ ज्ञानेश्वर आटोळे व कुणाल पवार यांना आधीच अटक झाली असून त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे़ त्यानंतर अॅट्रॉसिटी नुसार दाखल गुन्ह्यात संशयित मराठा क्रांती मोर्चाचे अन्य पदाधिकाºयांवर संशय व्यक्त करण्यात आला होता़ त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक मनोज दादासाहेब मोरे यांच्यासह १६ जणांनी शहर पोलीस स्टेशनला स्वत:हून आत्मसमर्पण करुन घेतले़
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पुरेशा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ शहरात शांतता आहे़