खरीपासाठी बाजारात लगबग वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:02 PM2019-05-27T22:02:53+5:302019-05-27T22:03:31+5:30
बीटी कपाशीला प्राधान्य : बियाण्यांच्या चौकशीसह खरेदीसाठी शेतकरी बाजारात
धुळे : जिल्ह्यात एकीकडे टंचाई तीव्र झालेली असताना दुसरीकडे बाजारात आगामी खरीप हंगामासाठीची लगबग वाढत चालली आहे. आवंटनानुसार प्राप्त झालेल्या बीटी बियाण्याच्या किमतीची चौकशी, खरेदीसाठी बाजारात शेतकºयांची गर्दी होऊ लागली आहे. तसेच बीटीव्यतिरिक्त अन्य कपाशी व पिकांच्या वाणाचीही माहिती त्यांच्याकडून घेण्यात येत असल्याने सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत.
जिल्ह्यात कपाशीची होणारी लागवड लक्षात घेऊन यावर्षी बीटी कपाशी बियाण्यांची ११ लाख ६३ हजार पाकिटे मंजूर झालेली असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने पुरवठा यापूर्वी सुरू झाला आहे. सर्वच शेतकरी एकाच वेळी लागवड करत नाही. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहेत असे मोजके शेतकरी पूर्वहंगामी लागवड (धूळपेरणी) करतात. पण बहुतांश शेतकºयांकडे कोरडवाहू शेती असल्याने त्यांना पावसाची प्रतीक्षा करण्यावाचून गत्यंतर नसते. त्यामुळे मागणीएवढी पाकिटे वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला.
शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बीटी बियाणे २५ मेपूर्वी विक्री न करण्याच्या सूचना कृषीनिविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कंपन्यांकडून पुरवठा सुरू होताच शनिवारनंतर विक्री सुरू केली आहे. रविवारी बाजारपेठ बंद असतांनाही बियाणे घेण्यास आलेल्या शेतकºयांची गर्दी दिसून आली.
कपाशीखालील क्षेत्र वाढणार
यंदा जिल्ह्यात खरिप हंगामांतर्गत एकूण ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित करण्यात आलेली आहे. त्यापैकी २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड होणे अपेक्षित आहे. जोरदार व नियमित पाऊस झाल्यास ही लागवड अडीच लाख हेक्टर क्षेत्राचा आकडा गाठेल, असा अंदाज आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी दरवर्षी कपाशीला प्राधान्य देत असल्याने दरवर्षी त्याखालील क्षेत्रात वाढ होत असून दुष्काळामुळे आहे. यंदा दुष्काळामुळे पूर्वहंगामी कपाशी लागवडीचे प्रमाण नगण्य राहील, अशी शक्यता आहे. बीटी कपाशी व्यतिरिक्त बाजरी, ज्वारी, तूर, मका आदी पिकांचे बियाणेही या महिन्याअखेरपर्यंत होईल, असे सांगण्यात आले. शेतकरी कृषीनिविष्ठा केंद्रांवर जाऊन अपेक्षित बियाणे उपलब्धता, त्याची किंमत याबाबत चौकशी करत आहेत. काही खरेदी करत आहेत. तर काही शेतकरी पाऊस झाल्यानंतर बियाणे खरेदी करतील, असे कृषीनिविष्ठा विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आवर्जून सांगितले.
कृत्रिम टंचाईचा संभव
या संदर्भात बाजारात कानोसा घेतला असता बीटी कपाशीत राशी-२ ला शेतकºयांकडून मागणी होते. परंतु त्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे कृत्रिम टंचाई जाणवण्याचा संभव आहे. त्यामुळे कृषी विभागाने खबरदारी घेऊन संबंधित कंपन्यांना मागणीनुसार एकाचवेळी पुरवठा करण्याबाबत सूचना करावी, अशी मागणी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्व शेतकरी एकाचवेळी लागवड करत नसले तरी ते बियाणे खरेदी करून ठेवतात. मात्र शेतकºयांनी एका विशिष्ट वाणाची मागणी करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.