सोशल डिस्टन्स ठेवत पार पडला विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 10:03 PM2020-04-21T22:03:18+5:302020-04-21T22:03:37+5:30
दोंडाईचा : अवघे सातजण उपस्थित, मास्क लावूनच पुरोहिताने म्हटली मंगलाष्टके
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : कोरोना या संसर्गजन्य आजाराने देशात हाकाकार उडविल्यामुळे देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे लग्नसोहळेही रद्द केले आहे. मात्र अशा परिस्थितीत दोंडाईचात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून अवघ्या सात जणांच्या उपस्थितीत दोंडाईचात आदर्श विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याची शहरात चर्चा सुरू आहे.
शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे येथील बी. एच. पाटील हे दोंडाईचा येथे पार्श्वनाथ नगरात वास्तव्यास आहे. ते झोतवाडे येथील समता विद्यालयात शिक्षक आहेत. त्यांचा मुलगा डॉ.राहुल पाटील यांचा विवाह नांदगाव तालुक्यातील न्याय डोंगरी येथील संतोष शिंदे यांची कन्या नंदिनी हिच्याशी निश्चित झाला होता.हा विवाह ८ मे ला होता. परंतु ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. कोरोनाची महामारी व आलेले राष्ट्रीय संकट याचा विचार करता राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पाटील व शिंदे परिवाराने साध्या पद्धतीने २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. यावेळी वरपिता बी. एच. पाटील व वधुपिता संतोष शिंदे ,भटजी व अन्य दोन जण यांचा उपस्थितीत.ची राहुल व नंदिनी यांची रेशीम गाठी पार्श्वनाथ नगरचा घरी बांधल्या गेल्यात.
लॉकडाउनचे तंतोतंत पालन करीत सोशल डिस्टन्स राखत, तोंडाला मास्क लावत, भटजींनी मंगलाष्टके म्हटली. विवाहासाठी वाजंत्री, मंडप ,जेवणावळी नव्हती. या विवाह मुळे वर व वधू पित्याचा लाखो रुपयांचा खर्च वाचला असून नातेवाईकांची पण धावपळ वाचली आहे.या आदर्श विवाहाची चर्चा दोंडाईचा सह परिसरात होत आहे.