हुतात्मा योगेश भदाणे पंचत्वात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:14 AM2018-01-16T05:14:42+5:302018-01-16T05:14:51+5:30
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील हुतात्मा जवान योगेश मुरलीधर भदाणे (२८) यांच्यावर सोमवारी सायंकाळी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चितेला पुतण्या मोहित नितीन भदाणे (७) यांनी अग्निडाग दिला. मन हेलवून टाकाणारे हे दृश्य पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. या वेळी ‘अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता.
जम्मू-काश्मीर येथे शनिवारी सकाळी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात योगेश भदाणे यांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्यांचे पार्थिव सोमवारी सायंकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी त्यांच्या मूळ गावी खलाणे (ता. शिंदखेडा) येथे आणण्यात आले. अंत्यसंस्कारांपूर्वी सैन्य व पोलीस कर्मचाºयांनी तीन राऊंड फायर करून हुतात्मा भदाणे यांना मानवंदना दिली.
हुतात्मा योगेश यांचे स्मारक लवकरच बनविण्यात येईल. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या वेळी सांगितले. पालकमंत्री दादा भुसे व विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. योगेश यांच्या पश्चात आई मंदाबाई, वडील मुरलीधर भदाणे, पत्नी पूनम उर्फ प्रिया व दोन बहिणी असा परिवार आहेत.