नेर व नगाव येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 01:34 PM2020-09-06T13:34:55+5:302020-09-06T13:37:04+5:30
शेतकरी हवालदिल । घरांचे छत उडाले, झाडे उन्मळून पडली, मका, बाजरी, पपईसह अन्य पिके जमीनदोस्त
धुळे : धुळे शहरासह तालुक्यात नेर आणि नगाव येथे शुक्रवारी रात्री अतिवृष्टी झाली आहे. तर साक्री तालुक्यातील पश्चिम पट्टयात उंभरे येथे शुक्रवारी सायंकाळी गारपीट झाली आहे. नेर येथे तहसीलदारांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तर उंभरे येथे आमदार मंजुळा गावीत यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. धुळ्यात ८० तर नेरला ८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नेर येथे पंचनामे सुरु
नेर- नेरसह परिसरात शुक्रवारी झालेल्या वादळी आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले असून शेतातील उभी पिके आडवी झाली आहे. तर अनेक झाडे उन्मळून पडली असून अनेक घरांचे पत्रे उडाले तर काहींच्या घरांच्या भिंती, धाबे कोसळल्याने अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार तहसीलदार किशोर कदम यांच्यासह नेर मंडळाधिकारी राजेंद्र देवरे, नेरच्या तलाठी राजश्री सुर्यवंशी, बाळापुरचे तलाठी महेंद्र पाटील, गोंदुर तलाठी एस.जी. सुर्यवंशी, भदाणे तलाठी वैशाली बावस्कर, कोतवाल नाना कोळी, सुनिल देवरे, महसुल कर्मचारी, भदाणे येथील कृषी सहाय्यक पवार यांचे पथक शनिवारी दुपारी दाखल झाले. त्यांनी पंचनाम्याचे काम सुरू केले आहे.
नुकसान भरपाईची मागणी
नेर शिवारातील डॉ.सतिष बोढरे, बद्रुद्दिन खाटिक, राजेंद्र जैन, राजाराम हिराजी माळी, दिपक बोढरे, देवेंद्र जैन यांच्यासह अनेक शेतकºयांच्या शेतात पाहणी केली. तसेच ज्या शेतकºयाने विमा काढला असेल त्यांनी कंपनीशी संपर्क साधून नुकासानीची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले. दरम्यान, डॉ.सतीष बोढरे यांनी तहसीलदारांना विनंती केली की, ज्या शेतकºयांनी विमा काढलेला नाही त्यांचा शासकीयस्तरावर विचार करावा. अगोदरच कोरोनामुळे शेतकºयांची आर्थिक परिस्थिती खुपच खराब झाली आहे. त्यात आता अस्मानी संकट आले आहे. त्यामुळे शेतकºयांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.
भदाणे शिवार
भदाणे शिवारातील रघुनाथ बिजू महानर, भटू बिजू महानर, प्रभाकर भटू माळी, भीमराव झगू श्रीराम, दगडू सखाराम श्रीराम, मधुकर आप्पा श्रीराम, विजय महारू श्रीराम, परमेश्वर मधुकर पाटील, प्रकाश मन्साराम पाटील, दिनेश जयस्वाल, रमेश खंडू जाधव यांच्यासह अन्य शेतकºयांचे मका, बाजरी, कापूस, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नामदेव यशवंत सूर्यवंशी, बेबीबाई हिलाल कोळी व आदिवासी वस्तीवरील नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. तर काही पत्रे खाली कोसळले. प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शिवसेनेकडून पाहणी
नेर परिसरात शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी पदाधिकाºयांसह शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पहाणी केली. ज्या शेतकºयांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकरी बांधवांना शासनाची मदत तसेच पिक विम्याचा मोबदला मिळाला पाहिजे. कुणीही शेतकरी वंचित राहता कामा नये. यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. ज्या नुकसानग्रस्त शेतकºयांपर्यंत प्रशासन पोहचले नसेल, अशा शेतकरी बांधवांनी शिवसेना कार्यालयात संपर्क साधावा किंवा गावातील शिवसैनिकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी युवा सेनेचे पंकज गोरे, माजी विरोधी पक्षनेते रवींद्र काकड, नेर विभाग प्रमुख रवींद्र वाघ, मंगलसिंह गिरासे, शेतकरी नारायण बोडरे, देवेंद्र त्रिभुवनदास, महेंद्र राजाराम बोढरे, सर्कल आर.बी. देवरे, भटू गवळी, केशव माळी आदी उपस्थित होते.