शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना मारहाण केल्याप्रकरणी महापौर, त्यांच्या नगरसेवक मुलासह आठ जणांविरूद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:22 PM2019-05-08T12:22:16+5:302019-05-08T12:22:57+5:30
धुळ्यातील घटना : मोबाईल हिसकावला, आरोपींच्या अटकेचे प्रयत्न, पोलिसांची माहिती
लोकमत आॅनलाईन
धुळे : शहरातील जुने धुळे परिसरात किरकोळ कारणावरून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांना महापौर चंद्रकांत सोनार, त्यांचा मुलगा नगरसेवक देवा सोनार व जमावाने मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमावेळी घडली. याप्रकरणी महापौर, देवा सोनार व अन्य आठ जणांविरूद्ध आझादनगर पोलिसांत बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी स्वत: या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता जुने धुळे परिसरातील सागर चव्हाण याच्या लग्नानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. तेथे भेट दिल्यानंतर जिल्हाप्रमुख माळी केशव येडू माळी, दिनेश कोळेकर आदी कार्यकर्त्यांसह चिंचेच्या झाडाजवळ उभे होते. त्यावेळी तेथे महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक देवा सोनार व अन्य आठ जण तेथे आले आणि माळी यांच्या मागे थोड्या अंतरावर उभे राहिले. देवा सोनार याने जिल्हाप्रमुख माळी यांच्याजवळ उभ्या असलेल्या कोळेकर यास आवाज देऊन बोलविले. परंतु तो आला नाही. त्याचा राग आल्याने चंद्रकांत सोनार, देवा सोनार, त्याचा भाऊ भूषण सोनार व इतरांनी यांनी चाकू, लोखंडी रॉडच्या सहाय्याने जिल्हाप्रमुख माळी यांच्यावर हल्ला केला. त्यांना खाली पाडून शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून माळी यांना वाचविले. परंतु यावेळी त्यांचा तीन हजार रुपये किमतीचा नवा मोबाईल फोन खिशातून बाहेर काढला असता देवा सोनार याने तो हिसकावला, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आझादनगर पोलिसांत महापौर चंद्रकांत सोनार, नगरसेवक देवा सोनार, भूषण सोनार, भैय्या उर्फ नरेंद्र मधुकर सोनार, चंद्रकांत सोनार यांचे दोन पुतणे (नाव माहिती नाही), टिंक्या प्रकाश बडगुजर, शुभम बडगुजर, किरण वराडे व इतर जमावाविरूद्ध भादंवि कलम ३९५, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री घटनेचे वृत्त कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.