सांडपाण्यासह पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठीच उपाययोजना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:25 PM2020-05-23T22:25:33+5:302020-05-23T22:26:25+5:30
महापालिका प्रशासन। पावसाळ्याच्या अनुषंगाने कामाला मिळतेय गती
धुळे : शहरातील विविध नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर माती तर कुठे कचरा साचला आहे़ नाल्यांची स्वच्छता करण्यापुर्वी नाल्यात आलेली माती बाजुला करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे़ या कामाच्या पहिल्याच दिवशी हमालमापाडी भागातील नाल्यासह राजवाडे नगरात येणारा नालाही स्वच्छ करण्यात आला़ सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी स्वत: लक्ष देवून काम मार्गी लावले़
दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापुर्वी नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात येत असते़ यंदाही नाले सफाईचे काम हाती घेण्यात आले असलेतरी सुरुवातीला नाल्यात आलेली माती कोरुन बाजूला करण्याचे काम मार्गी लावले जात आहे़ हमालमापाडी भागात काही ठिकाणी बांधकाम झाल्यानंतर त्याची माती ही तिथेच टाकून देण्यात आल्याचा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आलेला आहे़ त्यामुळे यावर कारवाई करीत नाल्यात आलेली माती जेसीबी यंत्राच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम शनिवारी सकाळपासून सुरु होते़
हमालमापाडीनजिक असलेल्या नाल्यांच्या स्वच्छतेनंतर राजवाडे नगरातील नाल्याकडे प्रशासनाने आपला मोर्चा वळविला़ याठिकाणी देखील नाला स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले़ दिवसभर काम सुरु होते़
टप्याटप्प्याने होणार स्वच्छता
दरवर्षी नाला स्वच्छ करण्याचे काम पावसाळा सुरु होण्यापुर्वी केले जात असते़ यंदाही ते सुरु झाले असलेतरी अजूनही पाहिजे त्या प्रमाणात कामाला सुरुवात झालेली नाही़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची जवळपास सर्वच यंत्रणा कामाला लागली आहे़ त्यामुळे केवळ आवश्यक त्याच कामाला प्राधान्य दिले जात आहे़ नाल्यांची स्वच्छता करताना देखील प्राधान्यक्रम ठरविला जावून अंमलबजावणी केली जाणार आहे़
संकट येण्यापुर्वीच लक्ष केंद्रीत
पावसाळा सुरु झाल्यानंतर नाल्यांची स्वच्छता करण्यापेक्षा अगोदरच या कामांकडे लक्ष दिल्यास भविष्यातील अडचणी वेळीच दूर होण्यास मदत मिळू शकते़ लवकरच शहरातील मोठ्या नाल्यांची स्वच्छता मार्गी लावण्याचे नियोजन आखण्यात आले आहे़