धुळे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा चर्चेविनाच गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 11:31 AM2019-06-27T11:31:45+5:302019-06-27T11:32:42+5:30
आदल्यादिवशीच सर्वसाधारण सभेत विविध विषय मंजूर झाल्याने घेतला निर्णय
आॅनलाइन लोकमत
धुळे : आदल्या दिवशीच सर्वसाधारण सभा झाली असल्याचे कारण सांगत कुठल्याही विषयावर चर्चा न करता अवघ्या दोन-तीन मिनीटात जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा गुंडाळण्यात आली.
जलसंधारण समितीची सभा आटोपताच दुपारी २.१० मिनीटांनी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात स्थायी समितीची सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते होेते. व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती लिलावती बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन. आभाळे होते. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी.यांना काम असल्यामुळे ते अनुपस्थित होते. तर दोन समिती सभापतीही अनुपस्थित होते.
स्थायी समितीसाठी विषय पत्रिकेवरही सदस्यांचे रजेचे असल्यास रजा मंजुरीबाबत विचार करणे, विषय समित्यांनी मागील सभेत केलेल्या ठरावावरील कार्यवाहीचा आढावा घेणे, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा करणे, सभेचे इतिवृत्त व ठराव वाचून कायम करणे असे चारच विषय होते.
जे.एन. आभाळे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने सभा सुरू झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर अध्यक्ष दहिते यांनी माईक घेत, मंगळवारीच जिल्हा परिषदेची सभा झालेली असून, त्यात सर्व विषयांवर चर्चा होऊन ते विषय मंजूर केल्याचे सांगत सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे कुठल्याही विषयावर चर्चा न होता अवघ्या दोन-तीन मिनीटात ही सभा गुंडाळण्यात आली. त्यामुळे काही अधिकारी आल्या पावली माघारी कार्यालयात गेले.