धुळ्यात सट्ट्याचा ‘मिलन-बाजार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:23 PM2018-02-12T13:23:44+5:302018-02-12T13:25:53+5:30
सट्ट्याच्या धंद्यासोबतच शहरात सोशल क्लबच्या नावावर जुगाराचे पत्त्याचे क्लब चालविले जातात.
राजेंद्र शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : धुळे शहरातील गुंडगिरीला खतपाणी घालणारा सट्टा व जुगाराचा धंदा सरेआम सुरु असल्याचे शनिवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. पांझरा काठावर महापालिकेच्या चौपाटीवरील एका बंद स्टॉलमध्ये आणि पादचारी पुलाच्या जिन्याखाली सट्टा बेटींग सुरु होता. शहराचे आमदार अनिल गोटे शनिवारी त्याठिकाणी पोहोचले त्यांनी तेथील सट्टा चालविणाºया आणि खेळणाºया लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
धुळे शहरात सट्टा आणि जुगार खेळला जातो, आता हे जगजाहीर झाले आहे. हे धुळ्यात राहणाºया सर्वसामान्य नागरिकांनाही माहिती आहे. फक्त पोलिसांना ते माहित नसते. शहराची मुख्य बाजारपेठ पाचकंदीलच्या गजबजलेल्या भागात तसेच शहरातील आग्रारोड आणि मुख्य रस्त्यांना जोडून असलेल्या बोळींमध्ये ठिकठिकाणी चहाच्या टपºयांवर ‘मिलन, कल्याण आणि मुंबई बाजार’ हा सट्टा खेळला जातो. याठिकाणी सट्ट्याचा भाव फुटतो, तेव्हा ते पाहण्यासाठी गर्दी होते. अन्यथा दिवसभर एक व्यक्ती त्याठिकाणी बसला असतो. तो सट्टा लावणाºयाला पैसे घेऊन गुलाबी रंगाची छोटीशी चिठ्ठी देतो. भाव फुटल्यानंतर जर लावलेला आकडा आला तर त्या व्यक्तीने ती चिठ्ठी दाखवावी. त्याला लगेच पैसे दिले जातात. हा सर्व दोन नंबरचा व्यवहार बिनबोभाट सुरु असतो आणि तो त्या भागातील सर्वसामान्य नागरिक, व्यापाºयापासून सर्वांनाच माहिती असतो. मग पोलिसांनाच का दिसत नाही, असा प्रश्न धुळ्यातील कोणालाही विचारले तर तो हसून तुम्हालाही माहिती आहे, कशाला बोलायला लावता, असे सांगून यावर बोलायचे टाळतो. यातच सर्व येऊन जाते. या सट्टयाच्या पेढया चालविणारे ‘रंक’चे राजा झाल्याचे सर्वांनी पाहिले आहे. हे सट्टा किंग दररोज पांढरे शुभ्र कडक इस्तरीचे प्युअर कॉटनचे कपडे घालून विना नंबरप्लेटच्या नवीन बुलेटवर सकाळी निघतात. चौकात नेहमीच्या ठरलेल्या ठिय्यावर बसून सर्व व्यवसाय मोबाईलद्वारे कंट्रोल करतात. जर सट्टा पेढीवर पोलिसांची धाडही पडली तर त्याठिकाणी त्यांच्या भाषेत ‘पानटे’ लिहीणारा ‘पंटर’ पकडला जातो. त्याची नंतर जामिनावर सुटका होते आणि धंदा पुन्हा सुरु होतो. या कारवाईला दोन नंबरचे धंदेवाले आणि पोलिस विभागात यासाठी ‘कोटा रेड’ हा शब्द प्रचलित आहे.
शहरात या धंद्यात असे काही महारथी आहेत की त्यांच्या नावावर शहरात ठिकठिकाणी सट्ट्याच्या पेढया चालविल्या जातात. हे सट्टा पेढया चालविणारे ‘किंग’ समाजात नेते म्हणून मिरवितात. त्यांच्या वाढदिवसाला शहरात मोठ-मोठे बॅनर लावले जातात. त्यांचा वाढदिवस चौकात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. डीजेच्या तालावर त्याठिकाणी परिसरातील युवक थिरकतात. वाढदिवसाला शहरातील मोठ्या नेत्यांसह त्या भागातील पोलीस अधिकारी व कर्मचारीही आवर्जून हजेरी लावतात. हे सर्वप्रकार सर्वांना माहिती आहेत, परंतु कोणी याबाबत भ्र शब्द काढत नाही. आता हे सर्व धुळेकरांच्या अंगवळणी पडत चालले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या नामचीन सट्टा किंग आणि त्यांना अभय देणाºयांविरोधात कारवाई केली पाहीजे. मग तो कोणीही असो, त्यांचा मुलाहिजा बाळगता कामा नये. पोलीस विभागातील झारीच्या शुक्राचार्यांवरही कारवाई केली पाहीजे. तसे केले तरच शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर निश्चित आळा बसेल.
धुळेकरांना आता फक्त जिल्हा पोलीस अधीक्षकांकडूनच अशा कारवाईची अपेक्षा आहे. कारण ‘सट्टा किंग’ला सलाम ठोकणारे ‘खाकी’तील अधिकारी व कर्मचारी नागरिक नेहमीच पहात आले आहेत.
‘सोशल क्लब’चा फंडा
सट्टयाच्या धंद्यासोबतच शहरात सोशल क्लबच्या नावावर जुगाराचे पत्त्याचे क्लब चालविले जातात. याठिकाणी पत्ते खेळणाºया अनेकांचे संसार यामुळे रस्त्यावर आले आहेत. परंतु त्याकडे कोणीच गांभीर्याने बघत नाही. सोशल क्लबचे लायसन्स दिल्यानंतर त्याठिकाणी खरच समाजात चांगले युवा घडविण्याचे काम होते आहे की युवा पिढीला बरबाद करण्याचे काम केले जाते आहे. याकडे कोणीच पहात नाही. अशा सोशल क्लबच्या नावावर चालणाºया क्लबस्वरही कारवाई करण्याची गरज आहे.