भुसावळमध्ये गुंडाच्या गोळीबारात सैन्याचा जवान ठार
By admin | Published: July 20, 2015 11:14 AM2015-07-20T11:14:45+5:302015-07-20T12:17:17+5:30
शहरातीलदीनदयालनगरात लुटमार व झटापटीत झालेल्या गोळीबारात शेख अकिल रहेमान (वय ३५, पंधरा बंगला, भुसावळ) हा सैन्यातील जवान ठार झाला.
भुसावळ : शहरातीलदीनदयालनगरात लुटमार व झटापटीत झालेल्या गोळीबारात शेख अकिल रहेमान (वय ३५, पंधरा बंगला, भुसावळ) हा सैन्यातील जवान ठार झाला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शेख अकिल रहेमान हा लखनौ येथे कार्यरत असलेला सैनिक रविवारी रात्री वेश्यावस्तीत आला होता. त्यांच्या अंगावर मोठय़ा प्रमाणावर सोने होते. ते लुटण्याच्या इराद्याने काही गुंडलोकांनी हा हल्ला केल्याचे समजते. या प्रकरणी मनोज ठाकूर व कलीम शेख सलीम या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबारानंतर शहरात अफवांचे पीक पसरले व पळापळ होऊन दुकानेही बंद करण्यात आली.
घटनास्थळावरून पोलिसांनी तीन जिवंत काडतुसे व पॉइंटटू बोअरची पिस्तूल जमा केले आहे. सैनिकाशी आरोपींचा वाद झाल्यानंतर त्यास बेदम मारहाण करण्यात आली तसेच डोक्यात दगड टाकण्यात आल्याची माहिती मिळाली.
शहरात गेल्या पंधरा दिवसात झालेला हा तिसरा खून आहे. ३ जुलै रोजी मल्ल मोहन बारसे यांचा तलवार हल्ल्यात तर काही दिवसांपूर्वी रेल दुनिया भागात एका युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्या पाठोपाठ ही घटना घडली आहे.