दुधाचे भाव अल्प तर पशुखाद्यांचे भाव गगनाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:56 PM2019-06-17T22:56:07+5:302019-06-17T22:57:02+5:30
मालपूर परिसर : दुग्ध व्यवसाय संकटात; चारा व पाण्याची देखील टंचाई
मालपूर : पशुखाद्याचे भाव गगनाला भिडले असून दुधाचे भाव अल्प झाले आहेत. यामुळे मालपूर येथील नावारुपाला असलेला दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे. परिसरात चारा व पाण्याची देखील टंचाई भासत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील दुग्ध व्यवसाय जिल्ह्यात नावारुपाला आहे. मात्र सध्या पशुखाद्याचे वाढत चालले भाव चारा व पाणी टंचाईमुळे संकटात सापडला असून हा व्यवसाय देखील परवडेनासा झाल्यामुळे अनेक कुटुंबांचा उपजिविकेचा प्रश्न उभा राहिला आहे.
सरकी ढेप पोत्याची किंमत १३०० वरुन १८५० रुपयांपर्यंत पोहचल्यामुळे आता पशुंना खाऊ घालावी का नाही हा प्रश्न निर्माण होतो. तुलनेत दुधाचे भाव अत्यल्प असल्यामुळे परिणामी चारा, पशुखाद्य आदींचा खर्च जाता हातात काहीच शिल्लक रहात नसल्यामुळे उपजिविकेचा प्रश्न उभा राहिला आहे.
सरकी ढेप पोते ६० किलोला १८५० रुपये, गुलटन ४० किलो पोते ९०० रुपये, तुंवरदाण ५० किलो ११५० रुपये, उडीददाण ५० किलोला ११५० रुपये, मका भुसा सुमारे प्रतिकिलो ६ ते ७ रुपये आदी पशुखाद्यांच्या सध्या किंमती असून दुधाऐवजी याचा भाव गगनाला पोहचल्याचे पशुपालक सांगतात.
दुधाचे भाव
मालपूर येथे दुधाला फॅटप्रमाणे भाव दिला जातो. गायीच्या दुधाला ४.० फॅटला २५ रुपये लिटर, ३.०४ फॅटला २२ रुपये तर ३.०ला २२ रुपये असा भाव देत असल्ळाचे पशुपालक सांगतात. म्हशीचे दूध डेअरीवर न देता प्रत्यक्ष गावात बंदीने विक्री होत असल्याचे दिसून येते. पशुपालक व ग्राहक यांच्यातला तिसरा घटक डेअरी बाजुला करावा लागतो तरच म्हशीचे दूध विक्रीस परवडते अन्यथा नाही.
सध्या मालपूरसह परिसात भिषण दुष्काळी परिस्थिती असून चारा, पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पैसे देऊन चारा मिळत नसल्याचे संकट पशुपालक सांगतात.
मध्यप्रदेश, सातपुडापर्वत रांगाच्या पायथ्याजवळून येथील पशुपालक चारा आणत आहेत. येथेही टंचाई असून शोधाशोध करुन किंमती भावाने चारा खरेदी करुन आणावा लागत असून याचा खर्च देखील उत्पन्नापेक्षा जास्त असल्यामुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे.
हिरवा चारा व कोरडा चारा यांचे योग्य प्रमाण पशुंना द्यावे लागते. मात्र हिरवा चारा पुरेसा कुठेच उपलब्ध नसल्यामुळे याचा दुधावर परिणाम होत आहे.
चारा कसदार असेल व ढेप गुलटनचे योग्य प्रमाण असेल तरच दुधाळ जनावरे योग्य प्रमाणात दुध देतात. चारा, ढेप, गुलटनच्या गगनाला भिडलेल्या किंमतीमुळे मालपूर येथील दुग्ध व्यवसाय संकटात सापडला आहे.