कोटय़वधीची यंत्रसामग्री धूळखात
By admin | Published: January 8, 2017 12:27 AM2017-01-08T00:27:08+5:302017-01-08T00:27:08+5:30
दहीवद येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याने कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडली आहे.
दहीवद : पाच वर्षापासून शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्याने कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्री धूळखात पडली आहे. विविध समस्यांच्या आर्थिक पेचात सापडलेल्या शिसाकाला नवनियुक्त संचालक मंडळाने तातडीने पावले उचलून भाडे तत्त्वावर इतरांना चालविण्यासाठी द्यावा किंवा आर्थिक संकटांवर मात करून स्वत: कारखाना सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा कारखानारूपी माळरान उजाड होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दहा वर्षापूर्वी सुजलाम सुफलाम अवस्थेत असलेल्या शिसाकाला सत्तापालट झाल्यानंतर घरघर लागली. 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत कारखान्याची सूत्रे 1983 ते 1990 दरम्यान कारखान्यातच लिपिक पदावर असलेल्या व्ही.यू. पाटलांकडे गेली. त्यांच्या कारकिर्दीत फक्त दोन हंगाम कारखाना कसाबसा चालला. त्या दरम्यान कारखाना तोटय़ात गेला. परिणामी कारखाना कर्जाच्या खाईत लोटला गेला. त्यानंतर 2011 पासून कारखाना बंद आहे. कारखाना प्रशासन कर्जाचे हप्ते चुकवू शकत नसल्याने अवघ्या 14 कोटी रुपयांचे कर्ज व्याजासकट 25 कोटींवर पोहचल्याने धुळे जिल्हा बँकेच्या तत्कालीन प्रशासकांनी कारखाना ताब्यात घेतला.
छताला पडले खिंडार
महामार्गालगत सुमारे वीस हजार चौरस मीटर क्षेत्रात असलेल्या कारखान्याच्या मुख्य इमारतीचे छत सिमेंट पत्र्यांनी बंदिस्त आहे. गेल्या सात वर्षापासून कारखाना बंद असल्याने छताची डागडुजी अथवा दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे ऊन, वारा, पावसाच्या आघाताने कारखान्याच्या छताला अनेक ठिकाणी पत्रा तुटून खिंडार पडले आहे. त्यामुळे त्याद्वारे पावसाळ्याचे पाणी कारखान्याच्या यंत्रसामग्रीवर पडते. यामुळे कोटय़वधी रुपयांची यंत्रसामग्री गंजून गेली आहे. मात्र त्याचे कुणालाच सोयरसुतक दिसत नाही.
कोटय़वधीची वाहने मातीमोल
कारखाना बंद झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळच एक जेसीबी मशीन, तीन ट्रक, पाच ट्रॅक्टर, दोन मिनीडोअर, पाचशेवर लोखंडी बैलगाडय़ा अशी चांगल्या अवस्थेतील कोटय़वधी रुपये किमतीची वाहने गंजून गेली आहेत. ती निकामी झाल्याने भंगाराच्या भावात जातील, अशी त्यांची अवस्था आहे.
सुरक्षा रामभरोसे
कारखाना अद्यापही जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. कोटय़वधी रुपयांची मालमत्ता सांभाळण्यासाठी प्रत्येकी सहा याप्रमाणे दोन टप्प्यांत एकूण बारा खासगी सुरक्षारक्षक कारखाना इमारतीची सुरक्षा पाहत आहेत. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून कारखान्याच्या मालमत्ता चोरीच्या लहान मोठय़ा घटना वाढल्या आहेत.
नवनियुक्त संचालकांसह सभासद शेतक:यांनी कारखाना बचावासाठी पुढे येणे गरजेचे आहे.