धुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाखोंची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 08:05 PM2018-08-30T20:05:18+5:302018-08-30T20:09:58+5:30
उत्पन्नावरही पाणी : व्यापा-यांनी धान्यखरेदी बंद केल्याचा परिणाम
लोकमत आॅनलाईन
धुळे : सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी दरात धान्य खरेदी करणा-या व्यापा-यांना शिक्षेच्या तरतुदीच्या निषेधार्थ व्यापा-यांनी चार दिवसांपासून धान्यखरेदीच बंद केली आहे. परिणामी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोज होणारी लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे बाजार समित्यांना मिळणा-या उत्पन्नावरही पाणी फेरले जात आहे. या प्रश्नी तोडग्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात धुळ्यासह शिरपूर, दोंडाईचा, साक्री व शिंदखेडा अशा पाच बाजार समित्या आहेत. सरकारच्या अन्याय धोरणाच्या निषेधार्थ व्यापा-यांनी शेतक-यांनी आणलेल्या शेतमालाची खरेदी बंद केली आहे. परिणामी बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे.
पावसाळा हा तसा धान्य खरेदी-विक्रीसाठी मंदीचा काळ समजला जातो. तरी येथील बाजार समितीत या दिवसांत रोज २५० ते ३०० क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री होते. त्यामुळे ५ ते ६ लाखांची उलाढाल होते. कमी-अधिक फरकाने सर्व बाजार समित्यांमध्ये हीच स्थिती आहे. त्यामुळे चार दिवसांपासून रोज सुमारे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
खरेदी-विक्री होणा-या शेतमालाच्या किंमतीवर शेकडा १ रुपये अशी बाजार फी आकारली जाते. त्यामुळे दिवसाकाठी या दिवसांतही बाजार समितीला कमिशनपोटी ५ ते ६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु चार दिवसांपासून त्यावरही पाणी फेरले गेले आहे. यामुळे या प्रश्नी सरकारने लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.