प्रलोभने दाखवून लोकांना घातला लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 05:41 PM2021-05-22T17:41:19+5:302021-05-22T17:41:52+5:30
११ जणांविरुध्द पिंपळनेरला गुन्हा
धुळे : ठेवीदारांना आकर्षक बक्षिसांसह दामदुपटीचे आश्वासन देवून ठेवी स्विकारणाऱ्या एका कंपनीने साक्री तालुक्यात लाखोंचा गंडा घातला. एका महिलेने हिम्मत करुन इतरांच्यावतीने पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी ११ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आलेला आहे.
एलआयसीआयएल एलडीएल रियल लाईफ क्रियेटर इंडिया लि. आणि रियल लाईफ ?ग्रो कॅटल प्रा. लि. या कंपनीच्या नावाने साक्री तालुक्यातील अनेकांकडून ठेवी स्विकारण्यात आल्या. या ठेवींवर आकर्षक बक्षिसांसह त्या दामदुप्पट करुन देण्याचा वायदा कंपनीच्यावतीने संचालकांसह प्रतिनिधींनी केलेला होता. परिणामी साक्री तालुक्यातील ग्रामस्थांनी जवळपास १ लाख ९० हजाराची रक्कम यात गुंतवली होती.
सन २०१२ पासून स्विकारण्यात आलेली मुळ रक्कम अथवा त्यावरील आकर्षक बक्षिस किंवा दामदुपटीचे पैसे न मिळाल्याने तक्रार होऊ लागली. मात्र ज्यांनी हे पैसे स्विकारले तेच उपलब्ध होत नसल्याने पैसे भरणाऱ्यांनी फसवणूक झाल्याची ओरड सुरु केली. असाच पैसा गुंतविणाऱ्या सामोडे येथील संगिता शगेंद्र याईस या ३९ वर्षीय महिलेने हिंमत करुन पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी चंद्रसिंग शिवाजी उर्फ शिवाजीभाई चव्हाण रा. सुरत, संतोष किसन सपाकाळी रा. सुरत, प्रदीप चिंतामण पानपाटील रा. सुरत, हिरालाल शंकर भालेराव रा.सुरत, प्रतिभा देविदास अहिरे रा. धुळे, भैय्या दिलीप अहिरे रा.पाडदळे ता. धुळे, चंद्रकला संजय खैरनार रा. धुळे, संगिता दिपक अहिरराव रा. धुळे, आशा काशिनाथ वसईकर रा. धुळे, भैय्यासाहेब यशवंत गुजेला रा. धुळे, ज्ञानेश्वर शिवदास पाटील रा.बल्हाणे ता.साक्री अशा ११ संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात अलेला आहे.
फसवणुकीची रक्कम लाखोंच्या घरात असल्याने गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याने सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे घटनेचा तपास करीत आहेत.