मांजरीची पिल्ले समजून घरी आणली बिबट्याची पिल्ले, दोन्ही शावकांना घेऊन मादी पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 12:29 PM2023-12-02T12:29:36+5:302023-12-02T12:30:10+5:30
leopard: मांजरीवर जीव लावणाऱ्या शेतकऱ्याला शेतात मांजरीसारखी दिसणारी पिल्ले पाहून कुतूहल वाटले आणि त्यांना गोंजारत घरी आणले. त्याची मुले पिल्लांसोबत खेळलीही, पण ती पिल्ले मांजरीची नसून बिबट्याची असल्याचे जेव्हा त्याला कळले तेव्हा शेतकऱ्याची घाबरगुंडी उडाली.
- प्रदीप पाटील
तिसगाव ढंढाणे (जि. धुळे) : मांजरीवर जीव लावणाऱ्या शेतकऱ्याला शेतात मांजरीसारखी दिसणारी पिल्ले पाहून कुतूहल वाटले आणि त्यांना गोंजारत घरी आणले. त्याची मुले पिल्लांसोबत खेळलीही, पण ती पिल्ले मांजरीची नसून बिबट्याची असल्याचे जेव्हा त्याला कळले तेव्हा शेतकऱ्याची घाबरगुंडी उडाली. पिल्लांना परत त्यांच्या ठिकाणी ठेवल्यानंतर पिल्लांच्या आईने मुलांसह रात्रीत ठिकाण सोडले. हा प्रकार वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पिल्ले पाहून उडाली घाबरगुंडी
nधुळे तालुक्यातील नाणेसीताणे येथील शेतकरी काशिनाथ माळी यांच्या शेतातील उसतोड मजुरांना दुपारी शेतात दोन शावके आढळून आली. ती शावके त्यांनी शेडवर आणली. त्यांची मुले त्या शावकांबरोबर मस्त खेळली. सकाळी शेतमालक माळी आले असता बिबट्याची पिल्ले पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी वनखात्याला कळविले.
लेकरांसाठी माय आली
ज्या ठिकाणाहून ही पिल्ले आणली होती, त्या ठिकाणी वनकर्मचाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी ती ठेवली. तसेच बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा लावला. रात्री ११ वाजेच्या सुमारास मादी बछड्यांजवळ आली.आजूबाजूला चाहूल घेत ती माघारी फिरली. पुन्हा पहाटे दोन वाजेच्या सुमारास ती शावकांजवळ आली अन् शावकांसह जंगलात पसार झाली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.