धुळ्यात राष्ट्रीय महामार्गाच्या गैरसोयीबद्दल आमदारांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 05:20 PM2023-02-11T17:20:36+5:302023-02-11T17:20:58+5:30
महामार्ग विभाग आणि टोल प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा आमदार डॉ फारुख शाह यांनी दिला.
धुळे - राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच मुंबई-आग्रा महामार्गावरील टोल प्रशासनाच्या विरोधात आज आमदार फारुक शाह यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील 40 गाव चौफुलीवर आंदोलन करणाऱ्या धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
महामार्ग विभाग आणि टोल प्रशासनाने तात्काळ या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा आमदार डॉ फारुख शाह यांनी दिला. तसेच, राष्ट्रीय महामार्ग तसेच सोनगीर व अवधान टोल नाका प्रशासन यांच्या दुर्लक्षपणामुळे पावसाळ्यात महामार्गाचे पाणी शहरात शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याच्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व अवधान व सोनगीर टोल नाका प्रशासन यांच्याकडे तत्काळ पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
याचबरोबर, चाळीसगाव चौफुली येथे उड्डाणपूल नसल्यामुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. दोन्ही ठिकाणी नागरिकांना कुठल्याही सुविधा न देता वाहन चालकांकडून टोल प्रशासनाच्या माध्यमातून टोल आकारणी केले जाते. याविरोधात आज आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आमदार फारुख शाह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करून उड्डाणपूल मंजुर करून घेतला आहे. परंतु आजपर्यंत त्याचे काम सुरु झालेले नाही. तसेच महाराष्ट्राच्या सीमेपासून ते नाशिकपर्यंत महामार्गाची व्यवस्था खराब झालेली आहे. त्यामुळे टोल प्रशासनाला टोल घेण्याचा अधिकार नाही. असा दावा यावेळी आमदार डॉ. फारूख शाह यांनी केला.