मोहाडी पोलिसांनी पकडला गुरांचा ट्रक, चालक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:15 PM2020-08-17T22:15:46+5:302020-08-17T22:16:03+5:30
मुंबई-आग्रा महामार्ग : लळींग शिवारातील घटना
धुळे : ट्रकमध्ये म्हशींना निर्दयीपणे बांधून मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकला मोहाडी पोलिसांच्या पथकाने लळींग गावाजवळच पकडले़ म्हशींसह १० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ ही कारवाई रविवारी दुपारी झाली़ याप्रकरणी चालकाला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे़
एमएच १८ एम ३९६५ क्रमांकाचा आयशर ट्रक हा मुंबई आग्रा महामार्गावरुन धुळे मार्गे मालेगावच्या दिशेने जाणार आहे़ त्यात म्हशी बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती मोहाडी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांना मिळाली़ माहिती मिळताच त्याची खातमजमा करुन लळींग घाटात गावाजवळ सापळा लावण्यात आला़ माहिती मिळालेला ट्रक मालेगावच्या दिशेने जात असल्याचे कळताच तो थांबविण्यात आला़ चालकाकडे चौकशी केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले़ ट्रकची कसून तपासणी केल्यानंतर त्यात काळ्या रंगाच्या गावरान जातीच्या १३ म्हशी निदर्यतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या़ वाहनात वाहन क्षमतेपेक्षा जास्त गुरे भरुन कत्तलीसाठी घेऊन जाताना हे वाहन मिळून आल्याने मोहाडी पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतला आणि म्हशींची सुटका केली़
याप्रकरणी पोलीस कर्मचारी कांतीलाल भगवान शिरसाठ यांनी १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास मोहाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार आयशर ट्रकवरील चालक फिरोज चांद पठाण (३८, रा़ बोलठाण ता़ नांदगाव जि़ नाशिक) याच्या विरोधात फिर्याद दाखल झाल्याने महाराष्ट्र प्राणी रक्षण कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घटनेचा तपास पोलीस कर्मचारी दराडे करीत आहेत़