काकाकडून विनयभंग पुतणीची आत्महत्या
By admin | Published: March 20, 2017 11:37 PM2017-03-20T23:37:02+5:302017-03-20T23:37:02+5:30
पित्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा, सात अटकेत
धुळे : सख्य्ख्या काकानेच अल्पवयीन पुतणीला त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्यानंतर तिचा परस्पर अंत्यविधी उरकून पुरावा नष्ट केल्याचे धक्कादायक प्रकरण शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे समोर आले आह़े दीक्षा भावराव आगळे (वय 15) असे मयत अल्पवयीन मुलीचे नाव आह़े तिने 14 रोजी पेटवून घेत आत्महत्या केली होती.
याप्रकरणी मुलीच्या पित्यासह नऊ जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या वडिलांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आह़े पतीपासून वेगळ्या राहणा:या मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने ही घटना उघडकीस आली.
सात जणांना अटक
पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर रविवारी रात्री 11 वाजता सात जणांना अटक केली़ त्यात दीक्षाचे मोठे काका, मुख्य संशयीत दगा उर्फ अण्णा देवचंद आगळे, सचिन सोनवणे, भावराव आगळे, शाहना आगळे, इंदूबाई आगळे, देवीदास आगळे, रेखा आगळे यांचा समावेश आह़े यात द्रुपदाबाई आगळे व सतीष आगळे हे दोघे फरार झाले आहे. दीक्षाची आई दीपाली उत्तम बैसाणे (माहेरचे नाव- वय 32, रा़ वडाळी, ता़शहादा) ही पतीपासून वेगळी राहत़े, तर तिची मुले शुभम व दीक्षा हे वडिल भावराव यांच्यासोबत राहतात़
दीपालीचे जेठ दगा उर्फ आण्णा देवचंद आगळे व सचिन मधुकर सोनवणे हे दोघे दीक्षाकडे वाईट नजरेने पाहायचे व पाठलाग करून सतत तिला त्रास द्यायचे. दोन महिन्यांपासून मेथी येथे हा प्रकार सुरू होता.
याबाबत दीक्षाने वडील भावराव देवचंद आगळे, आजी द्र्रुपदाबाई देवचंद आगळे, काकू इंदूबाई दगा आगळे, काका शाहना देवचंद आगळे, काकू रेखा शाहना आगळे, देवीदास दगा आगळे, सचिन दगा आगळे (सर्व रा़ मेथी) यांच्याकडे तक्रार केली़ मात्र त्यांनी उलट दीक्षाला शिवीगाळ करून तिला मानसिक त्रास दिला़
त्रासाला कंटाळून अखेर दीक्षाने 14 रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पेटवून घेत आत्महत्या केली़ त्याच दिवशी या नऊ जणांनी परस्पर तिचा अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कलम 305, 201, 354 अ, 354 ड, 506, 34 सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.