महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग; सोनगीर पोलिसांत एकाविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2023 06:57 PM2023-04-23T18:57:07+5:302023-04-23T18:57:22+5:30
गेल्या वर्षभरापासून महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करणाऱ्या एकाविरोधात सोनगीर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.
धुळे : गेल्या वर्षभरापासून महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करणाऱ्या एकाविरोधात सोनगीर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. ही घटना धुळे तालुक्यातील एका गावात घडली. धुळे तालुक्यातील एका गावातील महाविद्यालयीन तरुणी धुळ्यात एका महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी नियमित येत होती.
तिचा गेल्या वर्षापासून एक तरुण पाठलाग करीत होता. घरात एकटी असताना तिच्याकडे एकटक पाहत होता. अश्लील हावभाव करीत होता. वेळोवेळी इशारेदेखील करत होता. धुळ्यात येऊन तिचा पाठलाग करीत होता. मार्च महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात एके दिवशी महाविद्यालयापर्यंत पाठलाग करत बाहेर रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मुलीचा त्याने हात पकडला. मनास लज्जा होईल असे कृत्य त्याने केले. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सोशल मीडियाद्वारे मुलीला कॉल केल्याने तिने त्याला जाब विचारला. त्यानंतर शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने सोनगीर पोलिस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. त्यानुसार, एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.