मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 03:34 PM2019-02-12T15:34:09+5:302019-02-12T15:36:29+5:30
वर्षी आदिवासी आश्रमशाळेतील घटना : नरडाणा पोलिसांत गुन्हा
नरडाणा : शिंदखेडा तालुक्यातील वर्षी येथील अभय कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाºया एका विद्यार्थिनीचा दस्तुरखुद्द मुख्याध्यापकांनी वेळोवेळी विनयभंग केल्याची तक्रार नरडाणा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली असून त्यानुसार मुख्याध्यापकाविरूद्ध विनयभंगासह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वर्षी येथे अभय युवा कल्याण केंद्र संचलित शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळा असून त्या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ४५० विद्यार्थी शिक्षण घेतात. यात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाºया एका आदिवासी विद्यार्थिनीचा शाळेचे मुख्याध्यापक एस़ एस़ पवार यांनी गेल्या तीन महिन्यापासून वेळोवेळी विनयभंग केला. तशी तक्रार या विद्यार्थिनीने दाखल केली आहे. यात मुख्याध्यापकांनी तिच्या गळ्यात हात टाकणे, बेंचवर तिच्या हातावर हात ठेवून तिला लज्जा वाटेल असे कृत्य वेळोवेळी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या विद्यार्थिनीने त्याबाबत तिच्या पालकांना सांगितले. रविवारी मध्यरात्री विद्यार्थिनीचे पालक येथील पोलीस ठाण्यात आले आणि तक्रार दिली. त्यानुसार संबंधित मुख्याध्यापकाच्या विरुद्ध ३५४, अनुसूचित जाती जमाती कायदा ३ (१) व पोक्सो कायदा ८ व १० प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू अधिक तपास करीत आहेत.