धुळ्यात उधारीच्या पैशांचा वाद लोखंडी रॉडने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:08 PM2019-10-14T22:08:47+5:302019-10-14T22:09:14+5:30
पाच जणांविरुध्द गुन्हा : जखमीवर उपचार
धुळे : उधारीचे पैसे मागण्याच्या कारणावरुन एका तरुणाला मारहाण केल्याची घटना शहरातील राणाप्रताप चौकात शनिवारी रात्री घडली़ यात सर्रासपणे लोखंडी रॉडचा वापर झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़ याप्रकरणी आझादनगर पोलिसात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़
शहरातील वाखारकर नगरात राहणारा तेजस संजय जैन (१८) या तरुणाने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ त्यानुसार, गल्ली नंबर ६ मधील राणा प्रताप चौकातील एचडीएफसी बँकेजवळ अडवून उधारीचे पैसे मागण्यासाठी आलेल्या पाच जणांनी शिवीगाळ केली़ जीवे ठार मारण्याची धमकी देवून लोखंडी रॉडने उजव्या पायाच्या गुडघ्यावर मारहाण करण्यात आली़ यात गुडघ्याची वाटी फॅक्चर झाली आहे़ शिवाय लाथाबुक्यांनीही मारहाण करण्यात आली़
मारहाणीची घटना शनिवार १२ आॅक्टोबर रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली़ अचानक घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़ या घटनेनंतर लागलीच तेजस जैन याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ याप्रकरणी तेजस जैन याने आझादनगर पोलीस ठाण्यात रविवार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, जगदीश भवरलाल प्रजापती, त्यांची दोन मुले (रा़ गल्ली नंबर ६, धुळे) आणि अनोळखी दोन व्यक्ती अशा पाच जणांविरुध्द भादंवि कलम ३२६, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे़ पोलीस हेड कॉन्स्टेबल एम़ सी़ पाटील घटनेचा तपास करीत आहेत़