‘बबल्या इकस केसावर फुगे’ गाणे सर्वाधिक लोकप्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:32 PM2019-04-13T22:32:01+5:302019-04-13T23:08:56+5:30
तब्बल पंधरा दिवसात सत्तर लाखांहून अधिक रसिकांचे ह्ज
चंद्रकांत सोनार ।
जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी गावातील खान्देशातील लोकप्रिय कलावंत सचिन कुमावत व त्यांच्या टीमने गेल्या महिन्यात तयार केलेल्या व मनी माय बबल्या इकस केसावर फुगे या गाण्याला तब्बल पंधरा दिवसात सत्तर लाखांहून अधिक रसिकांचे ह्ज मिळवित हे अहिराणी गाणे उत्तर महाराष्ट्रात लोकप्रिय झाले आहे़
अहिराणी भाषेतुन स्थानिक
कलावंतांना संधी
मराठी, हिंदी भाषेप्रमाणे खान्देशातील मायबोली अहिराणी भाषेला राज्यस्तरावर दर्जा मिळावा, यासाठी कुटुंबाकडून कलाक्षेत्राचा कोणताही वारसा किंवा पाठिंबा नसतांना देखील शेंदूर्णी गावातुन स्थानिक कलावंतांना घेऊन 'हाई साली प्यार करं ना', 'लगीन मा मचाडू धुम रं धुम', 'सावन ना महिना मा तुनी याद करनी', अशी सुमारे ५० पेक्षा अधिक गाण्याच्या माध्यमातुन अहिराणी भाषेचे स्थान टिकवुन ठेवण्यात यश आले आहे़ २८ मार्च रोजी 'बबल्या ईकस केसावर फुगे' या गाण्याला १५ दिवसात ७० लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत़ या गाण्यात गायक अण्णा सुरवाड़े यांनी काम पाहिले असुन कृष्णा जोशी,बालू वाघ, संजु सोनवणे, समाधान निकम,ऋषिकेश चौधरी, राहुल गुजर,राहुलबाबा चौधरी,अल्पेश कुमावत यांच्या सहकार्यातून साकारले आहे़
अहिराणीला मराठी चित्रपटातस्थान मिळविण्याचा प्रयत्न
अहिराणी भाषेवरील सावन ना महिना मा या आहिराणी गाणे आतापर्यत ४ कोटी लोकांनी युट्यूबच्या माध्यमातुन पाहिले आहे़ खान्देशातील साडेतीन जिल्ह्यातील भाषेतील अहिराणी भाषेवरील गाणे मराठी चॅनलव्दारे घरोघरी दिसावे, यासाठी मी प्रयत्न केले़ मात्र प्रतिसाद न मिळता अहिराणी भाषेवरील गीतांना मराठी चॅनल्सकडून नाकारण्यात आले़ माझी कलावंतांशी स्पर्धा नसून मायबोली भाषेला राज्यस्तरावर पोहचविण्यासाठी प्रयत्न आहेत़ या क्षेत्रात बी.कुमार, अशोक चौधरी, श्री बिरारी, संजय सोनवणे यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळाली तसेच भविष्यात मोठ्या पडद्यावर काम करण्याची इच्छा आहे़
इंजिनियरींगचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुण्यात सात ते आठ हजारापर्यतची नोकरी केली असती़ मात्र कलावंत होऊन असंख्य रसिकांचे गळ्यातील ताईत झाल्याने मी समाधान आहे़ -सचिन कुमावत
खान्देशच्या मातीचा वारसा यु ट्यूबचा माध्यमाने साता समुद्रापार नेणाऱ्या सचिन कुमावत यांनी अहिराणी बोली भाषेवरील एका पेक्षा एक दर्जदार गाणे सादर करून संपूर्ण खान्देशात एक नवीन ओळख निर्माण केली आहे़ त्यामुळे तरूणांपासून तर ज्येष्ठ नागरिकांनापर्यत सचिनच्या गाण्यानां पसंती मिळत आहे़
वेगळे काही केल्याशिवाय कोणी ओळखत नाही़
अहिराणी भाषेतील गीते लग्न समारंभात धूमधडाक्यात वाजविली जात आहेत. वेगळ्या धाटणीची मांडणी केल्यास किंवा वेगळे काही केल्यास लोक डोक्यावर घेतात, हे वास्तव आहे. तसाच प्रयत्न आपण केल्यामुळे आजवर अनेक अहिराणी गीते लोकप्रिय झाली असल्याचे खान्देशी कलावंत सचिन कुमावत ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले़