मुग, उडीदची पेरणी आता अशक्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:55 PM2019-06-27T22:55:56+5:302019-06-27T22:56:15+5:30
धुळे जिल्ह्यातील स्थिती : पाऊस लांबल्यास बाजरी, ज्वारी, मका पिक घेण्यावर द्यावा लागेल भर
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जिल्ह्यात कपाशी, मका, बाजरीच्या खालोखाल मूग, उडीदाची लागवड करण्यात येत असते. मात्र यावर्षी जिल्हयातील काही भाग वगळता अजुनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. अजून एक आठवडा पाऊस आला नाही, तर मूग, उडीद पिके घेता येणे अशक्य आहे, अशी स्थिती आहे. या संदर्भात आता कृषी विभागानेही शेतकºयांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केलेली आहे.
यावर्षी उन्हाची तीव्रता प्रचंड होती. तापमानाचा पारा ४५ ते ४७ डिग्री सेल्सीयसपर्यंत गेला होता. तापमान वाढल्याने, पाऊस दमदार होईल असा सर्वसामान्यांचा अंदाज होता. त्यातच हवामान विभागाने सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज वर्तविल्याने, शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
दरम्यान पावसाचा अंदाज लक्षात घेऊन, शेतकºयांनी खरीप हंगामासाठी शेती तयारी करून ठेवली. बि-बियाणे, खते घेऊन ठेवली आहेत. ८ जूनपासून मृग नक्षत्रास सुरूवात झाली. दरवर्षी या नक्षत्रात पाऊस पडून पेरण्यांनाही सुरूवात होत असते. गेल्यावर्षी २३ जून रोजी झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्यात पेरण्या सुरू झाल्या होत्या. मात्र यावर्षी मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले आहे. पाऊस लांबल्याने आता पेरण्याही लांबलेल्या असून, शेतकºयांचे डोळे आता आभाळाकडे लागलेले आहे.
कृषी विभागाने २०१९-२० या खरीप हंगामात जवळपास ४ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट प्रस्तावित केलेले आहे. यात २ लाख ३२ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड प्रस्तावित असून, उर्वरित १ लाख ८३ ८०० हेक्टर क्षेत्रावर मूग, उडीद, तूर, मका, नागली, भात आदी पिकांची लागवड करण्यात येत आहे.
अजून पेरणीला सुरूवात नाही
गेल्या तीन-चार दिवसात शिरपूर, साक्री तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. मात्र अजुनही पेरणी योग्य असा ६५ मिलीमीटर पाऊस कुठेच झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेच पेरणी सुरू झालेली नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
मूग, उडीदाची लागवड अशक्य
जिल्ह्यात कपाशी, मका, बाजरीच्या खालोखाल मूग, उडीदाची लागवड करण्यात येते. कमी कालावधीत येणारी ही पिके घेण्याकडे शेतकºयांचा कल असतो. कृषी विभागाने यावर्षी जिल्ह्यात मुगाची १८ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर तर उडीदाची ७ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर लागवड प्रस्तावित केली होती. मात्र यावर्षी आतापर्यंत पाऊस लांबलेला आहे. एका आठवड्यात पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नाही तर मुग, उडीदाची लागवड करणे अशक्य होणार आहे.
ेलागवड केली तरी उत्पादन घटणार
दरम्यान अपेक्षित पाऊस होऊन उडीद, मुगाची लागवड केली तरी त्याची अपेक्षित उगवण होणे अशक्य आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मका, बाजरीचे क्षेत्र वाढेल
मुग, उडीदाची लागवड न झाल्यास शेतकºयांना त्या क्षेत्रावर मका, ज्वारी, बाजरी पिकाची लागवड करता येणार आहे.
कपाशीची लागवडीची आशा
शेतकºयांचे नगदी पीक म्हणून कपाशीकडे बघितले जाते. गेल्या दोन तीन दिवसात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी किरकोळ स्वरूपात कपाशीची लागवड सुरू झालेली आहे.
अजुनही १० जुलैपर्यंत दमदार पाऊस झाल्यास, शेतकºयांना कपाशीची लागवड करता येऊ शकेल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
पूर्व हंगामी कपाशीला पाण्याची गरज
जिल्ह्यात ज्यांच्याकडे पाण्याची थोड्याफार प्रमाणात उपलब्धता आहे, अशा शेतकºयांनी पूर्व हंगामी कपाशीची लागवड केली होती. त्याचे क्षेत्र जवळपास २० हजार हेक्टर एवढे आहे. मात्र आता विहिरींनी तळ गाठल्याने, पूर्व हंगामी लागवड केलेल्या कपाशीला पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकºयांसमोर उपस्थित झाला आहे. पाऊस न झाल्यास हे पीक धोक्यात येऊ शकते असा अंदाज आहे.
महाबीजकडे केली मागणी
जिल्हयात अजुनही पेरणी योग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे काही दिवसात पाऊस न झाल्यास शेतकºयांना मुग, उडीद ऐवजी मका, बाजरी, ज्वारी या पिकाची लागवड करावी लागणार आहे. अशा आपत्कालीन स्थितीत बियाण्यांची टंचाई भासू नये म्हणून कृषी विभागाने अगोदरच महाबीजकडे मका, ज्वारी, तुरीचे जादा बियाणे उपलब्ध करून द्यावे यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.