वानराच्या उत्तरकार्यात ३०० जणांचे मुंडन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:15 PM2019-02-19T22:15:22+5:302019-02-19T22:16:07+5:30
न्याहळोद : गावातील ४० वानरांना फळे व भोजन यावेळी देण्यात आले
न्याहळोद : काही दिवसांपूर्वी विधुत शॉक लागून मादी वानर मृत झाली होती. तिची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या उत्तरकार्यत सुमारे ३०० ग्रामस्थांनी मुंडन केले . कार्यक्रमात एक हजार लोकांना जेवण देत असतांना गावात आलेल्या चाळीस वानरांना फळे व भोजन देऊन स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
गेल्या १० तारखेला आत्माराम नगर येथे विधुत शॉक लागून मादी वानर मृत झाली होती . या वानराचे उत्तरकार्य करावे असे अंत्ययात्रेत ठरले होते . त्यानुसार सर्व गावाकडून नियोजन करण्यात येत होते.
दुष्काळात खाद्याचा भटकंतीत हा अपघात झाला होता. त्यामुळे उर्वरित जिवंत वानरांची खाद्य व्यवस्था करावी असे सोशल मीडियावर आवाहन करण्यात येत होते. त्यानुसार गावातील युवक धाकु वाघ, भटू काकूलदे, राजू रायते व राहुल माळी यांनी वर्गणी गोळा करून वानरांना तीन हजाराची फळे आणून खाऊ घातली . तसेच गावकऱ्यांची पंगत सुरू झाली त्यावेळी वानरांना देखील जेवण वाढण्यात आले.
उत्तरकार्यात हिंदू धमार्तील चालीरीतीनुसार प्रेमदास बैरागी यांनी आग्या व पाणी दिले. दुखवटा ललिता बाई पवार व दशक्रिया कपडे अमजद खां पठाण यांनी दिले.