मनपाला अवैध नळ कनेक्शन तपासणीचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:37 AM2021-05-27T04:37:53+5:302021-05-27T04:37:53+5:30
धुळे : एकीकडे महानगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. ...
धुळे : एकीकडे महानगरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन नसल्याने नागरिकांना आजही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे, तर दुसरीकडे अवैध नळ कनेक्शनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना मनपाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
महानगरात ७८ हजार घरांची नोंद महापालिकेत करण्यात आली आहे. त्यातील ७१ हजार नागरिकांकडे नळ कनेक्शन घेतले आहे. तर सात हजार नागरिकांचे अवैध नळ कनेक्शन असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मनपाकडून अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले जाते. मात्र शहरात कोणत्याही ठिकाणी कारवाई होताना दिसून येत नाही. मनपा रेकॉर्डवरील पाणीपट्टीधारकांची संख्या ३९ हजार ४१५ पेक्षा अधिक आहे. तीन वर्षांपूर्वी महापालिकेत हद्दवाढीतील ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ११ गावांमध्ये पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपाची असताना हद्दवाढ गावामंध्येदेखील नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रारी नागरिकांच्या आहे. दरम्यान शहराची लोकसंख्या प्रचंड असताना केवळ ७१ हजार नळधारक आहेत. तर अनधिकृत नळधारकांवर कारवाई केल्यास, सर्वांना मुबलक पाणी मिळू शकेल. धुळे शहराला दररोज दिवसाला ४८ एलएमटी पाण्याची आवश्यकता असते. नागरिकांना दोन ते तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोट
शहरात महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून अवैध नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याासाठी सर्व कर्मचारी व विभागप्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे अवैध नळ कनेक्शन शोध मोहीम थंडावली होती. मात्र मनपाचा महसूल बुडू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
-अजिज शेख,आयुक्त, मनपा