कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या खाजगी रुग्णालयांना महानगरपालिकेचा चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:04+5:302021-04-30T04:46:04+5:30

धुळे : कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा देण्याची गरज असताना कोरोनाच्या खाजगी रुग्णालयांमध्ये अवाच्या सव्वा बिले आकारली ...

Municipal pressure on private hospitals to rob corona patients | कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या खाजगी रुग्णालयांना महानगरपालिकेचा चाप

कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या खाजगी रुग्णालयांना महानगरपालिकेचा चाप

Next

धुळे : कोरोनाच्या महामारीमध्ये रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना दिलासा देण्याची गरज असताना कोरोनाच्या खाजगी रुग्णालयांमध्ये अवाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत. खाजगी रुग्णालयांच्या बिलासंदर्भात महानगरपालिकेकडे तक्रारींचा पाऊस पडत आहे. धुळे शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत तब्बल ४४ तक्रारी दाखल झाल्या असून पालिकेच्या भरारी पथकांनी शासनाच्या निर्देशाप्रमाणे तब्बल २८ लाखांचे बिल कमी करून रुग्णांना व नातेवाइकांना दिलासा दिला आहे.

धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने बेड शिल्लक नाहीत, अशी परिस्थिती आहे. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसाठी तर वेटिंग आहे. याचा गैरफायदा खाजगी रुग्णालये घेत आहेत. खाजगी रुग्णालयांच्या अवाजवी बिल आकारणीमुळे अनेक रुग्ण त्रस्त झाले आहेत. याबाबत महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, खाजगी रुग्णालयांच्या अवाजवी बिल आकारणीला आळा घालण्यासाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे मनपा आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विभागनिहाय भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली. शहराचे दोन भाग करून स्वतंत्र नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्यात आले. तसेच विभागनिहाय पाच भरारी पथकांमध्ये अधिकारी-कर्मचारी मिळून प्रत्येकी ८ जणांची नियुक्ती आहे.

महानगरपालिकेच्या या भरारी पथकांकडे ३० मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत ३२ लेखी आणि १२ तोंडी अशा एकूण ४४ तक्रारी प्राप्त झाल्या. बाधित रुग्णांकडून विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारणीच्या या तक्रारी होत्या. या तक्रारींशी संबंधित रुग्णांना ६६ लाख २० हजार ९१० रुपये बिल आकारण्यात आले होते. मनपाच्या पथकांनी तपासणी करून त्यापैकी तब्बल २८ लाख २० हजार ७५० रुपये इतके बिल माफ केले आहे.

कोविड १९ च्या महामारीत मनपाच्या या कारवाईमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला असून रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भरारी पथकाकडे तक्रारी प्राप्त झाल्यावर तातडीने संबंधित रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन वैद्यकीय बिलांची तपासणी करण्यात येते. रुग्णांच्या तक्रारींची त्वरित दखल घेतली जात असल्याने खाजगी रुग्णालयांमधील अवाजवी शुल्क आकारणीला आळा बसला आहे, असा दावा महानगरपालिकेने केला आहे. अल्प उत्पन्न गटातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच पत्रव्यवहार करून महापालिकेच्या या कारवाईचे काैतुक केले आहे.

अशी आहेत पथके

अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त विनायक मोते, तुषार नेरकर या नियंत्रण अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पथकांचे काम सुरू आहे. सहायक लेखापरीक्षण अधिकारी अवसरमल, कोळपे, सहायक कर मूल्य निर्धारण अधिकारी बळवंत रनाळकर, लेखाधिकारी प्रदीप नाईक, वसुली निरीक्षक राजकुमार सूर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली ४ पथके कार्यान्वित केली आहेत. या पथकांमध्ये शिरीष जाधव, अजय देवरे, मधुकर निकुंभे, राजेंद्र माईनकर, चंद्रकांत मोरे, रविकिरण पाटकरी, सुनील माकडे, लेखापरीक्षण विभागाचे जावळे, शिंदे, पवार, शिरसाठ, कर्मचारी मधुकर वडनेरे, गणेश काकडे, मनोज चाैधरी, अनिल वळवी, अभिजित पंचभाई, अमोल तारगे आदींचा समावेश आहे.

Web Title: Municipal pressure on private hospitals to rob corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.