लौकी येथील नरबळीप्रकरणी तब्बल 15 वर्षानंतर खुनाचा गुन्हा
By Admin | Published: May 2, 2017 05:56 PM2017-05-02T17:56:52+5:302017-05-02T17:56:52+5:30
न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई
शिरपूर,दि.2 - तालुक्यातील लौकी शिवारातील एका शेतातील विहिरीत सतत पाणी असावे म्हणून पाटील बंधूंनी नरबळीचा प्रकार करून गावातीलच एका युवकाला ढकलून मारल्याची घटना घडल्यामुळे तब्बल 15 वर्षानी त्या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लौकी गावात आदिवासी भील समाजाची विधवा महिला (फिर्यादी) रेकडीबाई बुधा भील (60) राहत़े गावातील आबा राघो पाटील व बापू राघो पाटील यांचे लौकी गावाजवळील नदीकिनारी शेत आह़े त्या शेतातील विहिरीस सतत पाणी रहावे म्हणून त्यांनी नरबळीचा प्रकार केला होता. 15 वर्षापूर्वी फिर्यादी महिलेचा भाऊ शिवा रामसिंग मोरे-भील यास विहिरीत ढकलून दिले होते. या संशयित आरोपींनी त्यावेळी पोलिस ठाण्यात संगनमत करून अपघाती मृत्यु दाखविला होता़ दरम्यानच्या काळात पाटील बंधूंच्या धमकीमुळे त्या वृध्द महिलेस गाव सोडावे लागले होत़े त्यामुळे सदर महिला सांगवी येथे राहत होती़ पाटील बंधूंना वृध्द महिला सांगवी गावात असल्याचे कळाले, तिने पुन्हा या संदर्भातील केस उचल करू नये म्हणून पुन्हा पाटलांनी 21 जानेवारी 2016 रोजी तिच्या झोपडीवर जावून जातीवाचक शिवीगाळ केली़ तसेच गावातील चौकीत जीवंत जाळून टाकण्याची धमकी दिली होती. याबाबत महिलेने शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतरही गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशान्वये 2 मे रोजी पाटील बंधूंविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.