‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना नावालाच
By admin | Published: May 15, 2017 04:11 PM2017-05-15T16:11:48+5:302017-05-15T16:11:48+5:30
प्रचार-प्रसाराचा अभाव असल्याने शिरपूर तालुक्यातील जनता या योजनेबाबत उदासीन असल्याची बाब नुकतीच समोर आली
ऑनलाइन लोकमत
शिरपूर, जि. जळगाव, दि. 15 - मुलींचा जन्मदर वाढावा, बालविवाह रोखता यावे, अशा उद्देशाने राज्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाने सुरू केली़ मात्र, अटी, शर्ती व प्रचार-प्रसाराचा अभाव असल्याने शिरपूर तालुक्यातील जनता या योजनेबाबत उदासीन असल्याची बाब नुकतीच समोर आली असून तालुक्यात वर्षभरात केवळ 131 प्रकरणांची नोंद झाली आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने ‘सुकन्या’ योजना सुरू केली़ पुढे त्या योजनेचे विलीनीकरण करून 26 फेब्रुवारी 2017 रोजी शासनाच्या वतीने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू करण्यात आली़ दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील दोन्ही श्रेणीतील घटकांचा त्यात समावेश आह़े
या योजनेत दारिद्रयरेषेखालील दोन अपत्य मुलींसाठी लाभ देण्यात येणार असून, दारिद्रयरेषेवरील येणा:या मुलींनाही या योजनेचा काही प्रमाणात लाभ देण्यात येणार आह़े या योजनेत प्रधानमंत्री जनधन मुलीचे व तिच्या आईचे संयुक्त खाते बँकेत उघडण्यात येवून एक लाखाचा अपघात विमा व पाच हजार रूपयांचा ओव्हरड्रॉपचा लाभ घेता येईल़ एलआयसीकडे 21 हजार रूपयांचा विमा उतरविण्यात येवून मुलींच्या 18 वर्षे वयानंतर एक लाख रूपये विम्याची रक्कम मिळू शकते.
याखेरीज नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, कान, डोळे अवयव निकामी झाल्यास मदतीची तरतूद या योजनेत आह़े मात्र या योजनेचा लाभ व विम्याचा लाभ घेण्यासाठी मुलगी 10 वी उत्तीर्ण व 18 वर्षार्पयत अविवाहित असणे आवश्यक आह़े योजना कुटुंबात जन्मणा:या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल, त्यासाठी जन्म नोंदणी प्रमाणपत्र, मुलीचे वडील महाराष्ट्रीयन असल्याची अट असून, कुटुंब कल्याण नियोजनास त्यात प्राधान्य देण्यात आले आह़े प्राप्त माहितीनुसार, ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेची सुरुवात झाल्यापासून या तालुक्यात प्रकल्प क्रमांक 1 कडून 93 तर प्रकल्प क्रमांक 2 कडून 38 असे एकूण 131 प्रकरणाची नोंद असून, त्याला मार्गी लागण्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी या योजनेची सुरूवात झाली असली तरी प्रचार व प्रसारच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनता उदासीन दिसत आह़े या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी असा सूर उमटतांना दिसतो़
‘त्या’ आदेशाचे काय झाल़े़़
माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माहितीचे महाराष्ट्रदिनी ग्रामसभेत प्रकट वाचन व्हावे असे आदेश महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होत़े या आदेशाचे काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. बहुतांश ग्रामसभेत त्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आह़े
माझी कन्या भाग्यश्री योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी येणा:या काळात प्रामाणिक प्रयत्नांवर आमचा भर आह़े दारिद्रयरेषेखालील व दारिद्रयरेषेवरील दोन्हीं श्रेणीतील मुलींच्या जन्माची नोंद घेण्याचा आमचा प्रयत्न राहील़
-पी़आऱ पाटील
बालविकास प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती शिरपूर