नगाव पं. स. गणाच्या निवडणुकीत भाजपाची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:14 PM2018-04-07T16:14:09+5:302018-04-07T16:14:09+5:30
पोटनिवडणूक : निकाल घोषीत होताच कार्यकर्ते व विजयी उमेदवाराचा जल्लोष; कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे/तिसगाव : धुळे तालुक्यातील नगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपाने पुन्हा एकदा जागा राखली आहे. या निवडणुकीत भाजपाचे सुनील तुकाराम पाटील यांनी कॉँग्रेसचे उमेदवार विकास नानाभाऊ पाटील यांचा ५१६ मतांनी पराभव केला. निकाल घोषीत होताच, विजयी उमेदवारासह भाजपा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात एकच जल्लोष केला.
धुळे तालुक्यातील नगाव गावात पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या धुळे पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती भदाणे या नगाव ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यामुळे त्यांनी पं.स.सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. परिणामी, त्यांची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.
दुरंगी लढतीत भाजपाची सरशी
धुळे तालुक्यातील नगाव पं.स.गणाच्या पोटनिवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी नामनिर्देशन अर्ज दाखल करणाºया दोन जणांनी माघार घेतल्याने भाजपाचे सुनील तुकाराम पाटील आणि काँग्रेसचे विकास नानाभाऊ पाटील हे दोन जण रिंगणात होते. त्यासाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दिवसभरात नगाव येथील १२ केंद्रावर ४८ टक्के मतदान झाले होते. शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपाचे उमेदवार सुनील तुकाराम पाटील यांना २,४१६ मते तर कॉँग्रेसचे विकास नानाभाऊ पाटील यांना १,९०० मते पडली. भाजपाच्या विजयी उमेदवाराची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवार सुनील पाटील यांच्या गळ्यात पुष्पहार घालून तहसील कार्यालयात एकच जल्लोष केला.
प्रतीष्ठेच्या लढतीत भाजपाने मारली बाजी
तालुक्यातील नगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींचे लक्ष लागून होते. त्यात जवाहर गटाचे तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील व सायने येथील योगेश विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसचे विकास नानाभाऊ पाटील तर ज्ञानज्योती भदाणे, मनोहर भदाणे व राम भदाणे यांच्या नेतृवाखाली मनोहर भदाणे यांचे चुलत बंधू सुनील भदाणे हे रिंगणात होते. भाजपासाठी ही लढत प्रतीष्ठेची होती. तरीही नगाव गृ्रप ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया तिसगाव-ढंढाणे, वडेल, रामनगर, सायने येथील मतदारांनी भाजपाला कौल दिला. त्यामुळे सुनील पाटील यांना विजय मिळविता आला.
अर्ध्या तासात निकाल हाती
तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.
साडे दहा वाजेपर्यंत मतमोजणीचे काम पूर्ण झाले होते. शुक्रवारी नगाव येथील १२ केंद्रावर निवडणूक झाली होती. त्यानुसार आज मतमोजणीच्या ठिकाणी ४ टेबलावर मतमोजणी तीन फेºयांमध्ये करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी काम पाहिले. तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा धुळे तहसीलदार अमोल मोरे यांनी त्यांना मदत केली़