नगावचे कृषी केंद्र दुसऱ्यांदा फोडले; २१ हजारांचे बियाणे लांबविले
By देवेंद्र पाठक | Published: June 20, 2023 08:11 PM2023-06-20T20:11:25+5:302023-06-20T20:11:36+5:30
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील नगाव शिवारात माउली सर्व्हिस नावाचे खत व बियाणांचे दुकान चोरट्याने महिन्याभरात दुसऱ्यांदा फोडले.
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातील नगाव शिवारात माउली सर्व्हिस नावाचे खत व बियाणांचे दुकान चोरट्याने महिन्याभरात दुसऱ्यांदा फोडले. या दुकानातील २० हजार ४७२ रुपये किमतीचे कपाशी बियाणे चोरट्याने लांबविले. दरम्यान, चोरटा येथील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.
महेंद्र राजेंद्र पाटील (रा. नगाव, ता. धुळे) यांचे मुंबई - आग्रा महामार्गावर माउली ॲग्रो सर्व्हिसेस नावाचे खत व बियाणांचे दुकान आहे. या दुकानात २२ मे रोजी चाेरट्याने हातसफाई करून तब्बल पावणेदोन लाखांचा बियाणांचा ऐवज लांबविला होता. पुन्हा याच ठिकाणी रविवारी (दि. १८) रात्री ८ वाजेनंतर अवघ्या महिन्याभराच्या आत दुसऱ्यांदा या दुकानात चोरट्याने हातसफाई केली. दुकानात ठेवलेल्या कपाशी बियाणांपैकी २० हजार ४७२ रुपयांचे बियाणे आणि रोख रक्कम चोरट्याने लंपास केली आहे. हा प्रकार सोमवारी उजेडात आला असून, पश्चिम देवपूर पोलिसात महेश पाटील यांनी दिलेल्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारीवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल चाैधरी करीत आहेत.