अक्कलपाडातून नकाणेत पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 10:24 PM2017-08-05T22:24:52+5:302017-08-05T22:26:54+5:30
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना : मंगळवारपासून दररोज ५ दलघफू पाणी आणणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : नकाणे तलावातील जलसाठा घटल्याने ४० टक्के शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झालेले असतांनाच मनपा व पाटबंधारे विभागाने अखेर पाणीप्रश्नावर तात्पुरती मात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत़ साक्री तालुक्यातील धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात काहीशी भर पडली आहे़ त्यामुळे मंगळवारपासून दररोज ५ दलघफू पाणी अक्कलपाडा प्रकल्पातून हरण्यामाळव्दारे नकाणे तलावात आणले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली़
शहरावर ऐन पावसाळयात पाणी प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत़ एकिकडे तापीवरील सुलवाडे बॅरेजमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असतांना दुसरीकडे नकाणे तलावात केवळ ६ दलघफू जलसाठा उरला आहे़ त्यामुळे शहरात निर्माण होणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मनपातर्फे उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ दरम्यान, पाटबंधारे विभागाने देखील शहराला पाणीपुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून पाणी आणण्याची तयारी केली आहे़
गेल्या काही दिवसांत साक्री तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे़ त्यामुळे लाटीपाडा धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले असल्याने अक्कलपाडा प्रकल्पात मृतसाठ्यात वाढ होत आहे़ सध्या २५० दलघफू साठा अक्कलपाडा प्रकल्पात असून त्यातून दररोज ५ दलघफू जलसाठा हरण्यामाळ तलावात एक्सप्रेस कॅनॉल व्दारे आणले जाणार आहे़ हरण्यामाळ मधून नकाणे तलावात पाणी आणले जाईल, त्यामुळे पाण्याचा निर्माण होणारा प्रश्न तात्पुरता सुटू शकतो़ शहरात महापालिका मालकीच्या सात विहीरी आहेत़ अहिल्यादेवी नगर, अण्णासाहेब पाटील नगर, सोन्या मारूती कॉलनी, सिध्दार्थ नगर, नवजीवन नगर, शनि नगर व जमनागिरी भिलाटी याठिकाणी विहीरी आहेत़ त्याठिकाणी तात्पुरते पंप बसवून परिसरातील नागरिकांना वापरासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते़