नंदुरबार - शहादा चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 10:54 PM2019-06-17T22:54:14+5:302019-06-17T22:55:10+5:30
दोंडाईचा : अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक
दोंडाईचा : धुळे-दोंडाईचा-शहादा हा राज्य महामार्ग असून या मार्गावर चोवीस तास वाहतुकीची वर्दळ असते. या मार्गावरील अपघात टाळण्यासाठी, वाहतूक सुरळीत होण्यासाठी नंदुरबार चौफुली व संतोषी माता मंदिर चौफुलीवर सिग्नल बसविण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक व वाहन धारकांनी केली आहे.
दोंडाईचा शहर धुळे व नंदुरबारचे मध्यवर्ती स्थान आहे. राज्य क्र. सहावरील महत्त्वपूर्ण गाव आहे. अवजड वाहनांसह सर्वच प्रकारची वाहनांची नेहमीच वर्दळ या रस्तावर असते. दोंडाईचा शहराच्या या बायपास वरून शहादा, नंदुरबारकडे वाहने ये-जा करतात. येथून मध्यप्रदेश व गुजरात राज्यात जाणे सोयीचे आहे. महत्त्वाचे म्हणजे अहमदाबाद व तामिळनाडूचे अंतर या मार्गाने कमी होते. साहजिकच या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. १२ कि.मी. अंतरावर तापी नदी असून या नदीतून दररोज शेकडो ट्रक, ट्राला भरधाव वेगाने याच मार्गावरून जातात. साहजिकच अपघातास नेहमीच आमंत्रण असते. काही वर्षांपूर्वी भरधाव धावणाऱ्या रेतीचा ट्रकने दुचाकी वाहनधारकाला चिरडले होते. या मार्गावर नेहमीच छोटे मोठे अपघात होतात.
या अडचणीचा सामना सर्वसामान्य जनतेसह पोलिसांना करावा लागतो. सिग्नल नसल्याने वाहन वेगाने भरधाव जातात. यामुळे वाहनांची कोंडी होते. या मार्गावर वाहनांची संख्या, वहातुकीची कोंडी, अपघात, जीव मुठीत धरून जाणारे पादचारी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली कॉलनी, शाळा, बँक यांचा विचार करता अपघातास आळा घालण्यासाठी नंदुरबारचौफुली, केशरानंद पेट्रोल पंप, संतोषी माता मंदिरजवळ सिग्नलची मागणी होत आहे.