नराधम रेवनाथ भीलच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 02:36 PM2018-03-04T14:36:58+5:302018-03-04T14:36:58+5:30
पोलीस अधीक्षकांची माहिती : दोंडाईचा बालिका अत्याचार प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : दोंडाईचा येथील पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा नराधम रेवनाथ रामसिंग भगत (भील) (३५) रा़ म्हाळसानगर, दोंडाईचा याच्या मुसक्या विशेष तपास पथकाने रविवारी सकाळी आवळल्या़ तो या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली़
पाच वर्षीय बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून एका शाळेमागील निर्जन घराच्या अंगणात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी दोंडाईचा येथे घडली होती़ याप्रकरणी स्थानिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला होता़ त्यानंतर विशेष तपास पथकाची रचना करण्यात आली़ या पथकाने विविध माध्यमातून माहितीचे संकलन केले़ संवाद साधत संशयित रेवनाथ रामसिंग भगत (भील) याच्या तब्बल २४ दिवसानंतर मुसक्या आवळल्या़ त्याच्याकडून या प्रकरणातील इत्यंभूत माहिती संकलित केले जाईल़ यात कोण-कोण आहेत याचा छडा लावला जाईल़ कदाचित आरोपींची संख्या वाढू शकते़ त्या दृष्टीने सखोल तपास केला जाईल असा विश्वास पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी व्यक्त केला़
पत्रकार परिषदेप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासाधिकारी संदिप गावित, दोंडाईचा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी़ जे़ राठोड यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते़