धुळ्यातील कष्टकऱ्यांची मुले झाली राष्ट्रीय कुस्तीपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:19 PM2017-11-22T14:19:58+5:302017-11-22T15:46:50+5:30
दोघांच्याही घरात कुस्तीचा वारसा नाही, कुस्ती बघूनच मिळाली दोघांनाही प्रेरणा
आॅनलाईन लोकमत
धुळे,दि.२२ : घरची परिस्थिती साधारणच.. दोघांचेही वडील मजुरी, शेती करूनच परिवाराचा उदरनिर्वाह करतात. मात्र दोघ मुलांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड असल्याने, आज ते राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू झालेले आहेत. ही प्रेरणादायी कहाणी आहे निखील राजेंद्र माळी व जगदीश मोहन रोकडे या धुळ्यातील दोघ राष्ट्रीय कुस्तीपटूचीं.
धुळ्यात आयोजित ६३ व्या राष्ट्रीय शालेय कुस्तीस्पर्धेत ४२ किलो वजन गटात निखील माळी हा फ्रीस्टाईल तर जगदीश रोकडे हा ग्रीकरोमन प्रकारात कुस्तीचा डाव टाकणार आहे.
निखील माळी (१६, रा. जुने धुळे ) हा कि.सो.क.न्यू सीटी हायस्कुलचा दहावीचा विद्यार्थी आहे. बालपणापासूनच त्याला कुस्तीची आवड होती. तो बालगोपाल तालमीत नियमित व्यायामाला जायाचा. तेथे इतर कुस्तीपटूंच्या कुस्त्या बघून आपणही कुस्तीच खेळायची या विचाराने तो प्ररित झाला. त्याची कुस्तीमधील आवड बघून रवींद्र लाला माळी, आकाश परदेशी यांनी त्याला प्रशिक्षण दिले. निखीलही गेल्या पाच वर्षात कुस्तीत चांगलाच पारंगत झाला. मेहनत, उत्कृष्ट डावपेचाच्या आधारे त्याने आतापर्यंत अनेकांना कुस्तीत ह्यचीतह्ण केले आहे. तो आतापर्यत राज्यस्तरावर चारवेळा खेळला आहे. त्यात एक सुवर्ण, एक रजतपदक त्याने पटकावून आपल्या यशाचा झेडा रोवला आहे. राष्ट्रीयस्तरावर प्रथमच तो खेळतो आहे. निखीलच्या घरची परिस्थिती साधारणच आहे. त्याचेवडील राजेंद्र माळी हे महापालिकेत मजुरीचे काम करतात. घरी कुस्तीचा कुठलाही वारसा नसतांना त्याने स्वबळावर हे यश मिळविले आहे.
ही परिस्थिती आहे, जगदीश मोहन रोकडे या कुस्तीपटूची. तो सानेगुरूजी विद्या मंदिर न्याहळोदचा विद्यार्थी असून, सध्या दहावीत शिकतो आहे. जगदीशच्या घरातही कुस्तीचा वारसा नाही. वडील शेती करूनच परिवाराचा उदरनिर्वाह करतात. मात्र न्याहळोदला कुस्तीपटूंची चांगली परंपरा आहे. त्यांच्याप्रमाणेच आपणही कुस्तीपटू व्हावे असे त्याला वाटू लागले अन तो कुस्तीकडे वळला. तो गावातील सम्राट व्यायामशाळेत नियमित व्यायामाला जायाला लागला. तेथे त्याला बाबा कोळी, शांताराम पवार यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या तालमीत तो तयार झाला. गेल्या तीन वर्षांपासून तो कुस्ती खेळतोय. जगदीश हा ग्रीकरोमन प्रकारात खेळतो. राष्टÑीयस्तरावर तो प्रथमच धुळ्याचे प्रतिनिधीत्व करीत आहे. भविष्यात आपल्याला सैन्यात भरती व्हायच आहे, असे जगदीश रोकडे याने सांगितले.
निखील माळी व जगदीश रोकडे या दोघ शालेय कुस्तीपटंूमुळे धुळ्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. ही धुळे जिल्हावासियांसाठी गौरवास्पद बाब आहे.