नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 07:25 PM2018-02-02T19:25:51+5:302018-02-02T19:26:38+5:30
विखरण : राजकारण केल्याचा प्रकल्पबाधित शेतकºयांकडून निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : विखरण ता.शिंदखेडा येथील धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचे त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राजकारण करून स्थानिक आमदार तथा राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर बेछूट आरोप केल्याच्या निषेधार्थ विखरण गावाला प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी विखरण ग्रामपंचायतीच्या अंगणात पुतळयाला शेण मारून त्याचे दहन केले. दरम्यान, सर्व वृध्द शेतकºयांनी एकत्र येवून नवाब मलिक यांच्या पुतळ्याला हातातील काठीने बडवले.
यावेळी प्रकल्प संघर्ष समितीचे शांताराम पाटील, विठ्ठल पाटील, विक्रम तायडे, शंकरसिंग गिरासे, विश्वास पाटील, जगन पाटील, विनायक पाटील, भानुदास पाटील, भिमसिंग गिरासे, राकेश पवार, दिलीप कोळी, जितेंद्र गिरासे, विनोद पाटील, निलेश सावळे, चुनिलाल पाटील, दंगल पाटील, रमेश पाटील, संजय पाटील, सचिन पाटील, नारायण पाटील यांच्यासह विखरण प्रकल्पात जमीन गेलेले प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
प्रकल्प संघर्ष समितीचे शांताराम पाटील यावेळी म्हणाले की, प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकºयांना तत्कालीन जिल्हाधिकारी प्राजक्ता लवंगारे यांनी ८० हजार रुपये एकरी मोबदला शासकीय दरानुसार जाहीर केला होता, त्यानंतर संघर्ष समितीसोबत लोकप्रतिनिधी जयकुमार रावल यांनी या दराला तीव्र विरोध केला. परंतु तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी, तुमची या प्रकल्पात जमीन नाही. त्यामुळे तुम्ही बोलू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे आमच्यातील एका सहका-याने त्याच्या हिश्श्याची ५३ आर जमीन त्यांना देण्याचे ठरले म्हणून ती जमीन त्यांनी घेतली आहे. त्यात कोणताही गैरप्रकार नाही. धर्मा पाटील हे आमच्या संघर्षातील एक सहकारी होते. त्यांच्या मृत्यूचे राजकारण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला, वास्तविक या सर्व प्रकाराला तत्कालीन सरकारच जबाबदार असल्याचा आरोप संघर्ष समितीचे शांताराम पाटील यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी विठ्ठल पाटील, विक्रम तायडे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.