राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश शार्दुल भाजपच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:49 PM2018-02-13T12:49:32+5:302018-02-13T12:51:40+5:30
आमदार अनिल गोटेंची घेतली सदिच्छा भेट, स्वपक्षाच्या नेतृत्वावर नाराजी
धुळे : महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश शार्दुल यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत भाजपची वाट धरली आहे़ सोमवारी शार्दुल यांनी आमदार अनिल गोटे यांची सदिच्छा भेट घेतली़
महापालिकेत तब्बल ३६ नगरसेवक निवडून आणत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली़ मात्र मनपाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे विकास कामे न होणे, पक्ष नेतृत्वाकडून पदे वाटपातून होणारी नाराजी, केंद्रात आणि राज्यात भाजपची वाटचाल लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला़ केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर अन्य पक्षातील नगरसेवकांनी देखील आपापल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे़ त्यात राष्ट्रवादीच्या माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी उपमहापौर फारूख शाह, नगरसेवक सतिश महाले, माजी स्थायी समिती सभापती सोनल शिंदे, शहर विकास आघाडीचे नगरसेवक फिरोज लाला, जुलाहा रश्मीबानो, शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते संजय जाधव यांचा समावेश आहे़ तर अलिकडेच झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांनी भाजप उमेदवाराला मतदान करून नाराजी व्यक्त केलेली असतांनाच आता प्रभाग क्रमांक २९ अ मधील नगरसेवक दिनेश शार्दुल यांनी देखील पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे़ अर्थात, शार्दुल यांचा भाजपात अधिकृत पक्ष प्रवेश अद्याप झाला नसला तरी ते भाजपच्या वाटेवर आहेत़
राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी सभागृह नेते पदाबाबत दिलेला शब्द पाळला नाही़ त्यामुळे आमच्या सुतार समाजाकडून नाराजी व्यक्त झाली आहे़ पक्ष नेतृत्वाकडून मिळणाºया सावत्रपणाच्या वागणुकीमुळे भाजपात प्रवेश करणार आहे़ त्यादृष्टीने सोमवारी आमदार अनिल गोटे यांची भेट घेतली आहे़- दिनेश शार्दुल़