‘प्लास्टिक’च्या वापरावर कारवाईची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:15 PM2019-03-12T23:15:38+5:302019-03-12T23:16:03+5:30
महापालिका : शहरात पिशव्याचा सर्रास होतोय वापर, जनजागृतीचा अभाव
धुळे : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरण्यास बंदी असतांनाही या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे़ महापालिका व संबंधित प्रशासकीय यंत्रणा याविरूध्द कारवाई करीत नसल्याने प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर वाढत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे़
शहरात प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असल्याने याबाबत नागरीकांची मते जाणून घेतली़ ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणात प्लास्टीक पिशव्यांच्या वापराबाबत नागरीकांनी आपली स्पष्ट मते नोंदविली आहेत़ बंदी असतांना प्लास्टीक पिशव्यांचा वापर केला जात आहे काय ? या प्रश्नावर ५२ टक्के नागरीकांनी शहरात प्लास्टीकच्या पिशव्या वापरल्या जात असल्याचे सांगितले़ १६ टक्के नागरीकांनी नाही असे उत्तर दिले तर ३२ टक्के नागरीकांनी मात्र सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे़ प्लास्टीक पिशव्या वापरावर बंदी घातल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून दोषींवर कारवाई होते का ? या प्रश्नाच्या उत्तरात ५६ टक्के नागरीकांनी कारवाई होत नसल्याचे स्पष्ट केले आहे़ २० टक्के नागरीकांनी कारवाई होत असल्याचे सांगितले तर २४ टक्के नागरीकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले़
महापालिका प्रशासन कारवाई करीत नसल्यानेच प्लास्टीक पिशव्यांचा वापर होत असल्याचा आरोप यावेळी नागरीकांनी केला़
प्लास्टीक पिशव्यांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे का ? या प्रश्नावर उत्तर देतांना ७२ टक्के नागरीकांनी प्लास्टीक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होते, हे मान्य केले आहे़ १२ टक्के नागरीकांनी नाही असे उत्तर दिले तर १६ टक्के नागरीकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले आहे़ प्लास्टीक मुक्तीसाठी जनजागृती केले जाते का, या प्रश्नावर ४६ टक्के नागरीकांनी नाही असे उत्तर दिले़ २६ टक्के नागरीकांनी होय असे सांगितले तर २८ टक्के नागरीकांनी मात्र सांगता येत नाही, असे उत्तर दिले़ प्लॅस्टिकमुक्त शहर होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त होत आहे़
शहरी भागातच अधिक वापऱ़़
प्लास्टीक पिशव्यांचा वापर नेमका कोणत्या भागात होत आहे़ या विषयी नागरीकांना प्रश्न विचारला तेव्हा ६२ टक्के नागरीकांनी शहरी भागात प्लास्टीक अधिक वापर होत असल्याचे सांगितले़ २० टक्के नागरीकांनी अधिक वापर होत असल्याचे सांगितले तर १८ टक्के नागरीकांनी सांगता येत नाही असे उत्तर दिले़
नागरीकांवरही कारवाई करा
प्लास्टीक पिशव्यांचा वापर होतांना आढळल्यास व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाते़ वर्षभरापूर्वी अशा कारवाया झाल्या आहेत़ प्लास्टीकच्या पिशव्या वापरतांना आढळल्यास व्यापाऱ्यांबरोबर ग्राहक नागरीकांवरही कारवाई व्हावी का? असा प्रश्न विचारला तेव्हा ५२ टक्के नागरीकांनी होय असे उत्तर दिले आहे़ १८ टक्के नागरीकांनी नाही असे उत्तर दिले तर ३० टक्के नागरीकांनी सांगता येत नाही, असे उत्तर देवून प्रश्नाला बगल दिली़