देशाला सावरकरांच्या कृतिशिल विचारांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 04:08 PM2019-02-02T16:08:49+5:302019-02-02T16:10:59+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन : संमेलनाध्यक्ष दिलीप करंबेळकर यांचे प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे : भारताला जगापुढे आदर्श म्हणून उभे करायचे असेल तर सावरकरांनी सांगितलेल्या विज्ञानवाद, राष्टÑवाद या कृतीशिल विचारांची गरज आहे. तसेच समाजातील तळागाळात ज्ञानसंस्कृती रूजायची असेल तर जगातील अधिकाधिक ज्ञान स्वभाषेत आणले पाहिजे असे मत संमेलनाध्यक्ष तथा महाराष्टÑ राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी आज येथे केले.
महाराष्टÑ राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
मुंबई-आग्रा रोडवर गुरूद्वारासमोर असलेल्या कान्हा रिजेन्सी येथे हे साहित्य संमेलन सुरू आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष खा.डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे अध्यक्ष भिकू इदाते, सरचिटणीस रवींद्र साठे, देवगिरी प्रांत संचालक मधुकर जाधव, महापौर चंद्रकांत सोनार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवी बेलपाठक, उपाध्यक्ष सुभाष अग्रवाल, सचिव हर्षल विभांडीक होते.
दीपप्रज्वलन व सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाला सुरूवात झाली.
दिलीप करंबेळकर पुढे म्हणाले की, विसाव्या शतकाने राष्टÑवादाची अनेक रूपे पाहिली. काही देशांचा साम्राज्यवादी तर काही देशांचा वंशवादी राष्टÑवाद होता. सावरकरप्रणीत राष्टÑवाद हा गुणात्मकरित्या इतर राष्टÑवादाहून वेगळा होता.
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. विनायक सहस्त्रबुद्धे म्हणाले, सावरकरांनी विज्ञानाची, आधुनिकतेची कास धरली होती. सावरकरांनी समाजकारण, राजकारण व वाड.मयनिर्मितीत उल्लेखनीय कामगिरी केली. देशभक्ती हा त्यांचा प्राण होता. सावरकरांचे विचार अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकणार आहेत.
प्रास्ताविक रवींद्र साठे यांनी तर सूत्रसचांलन नम्रता पाटील, पंकज चौधरी यांनी तर आभार सुभाष अग्रवाल यांनी मानले.