स्पर्धा परीक्षेसाठी नियोजन गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:26 AM2019-10-16T11:26:39+5:302019-10-16T11:27:23+5:30
स्पर्धा परीक्षा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य डॉ. पवार यांचे प्रतिपादन
आॅनलाइन लोकमत
धुळे : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना झालेल्या अवांतर वाचनामुळे आदर्श नागरिक घडत असतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतांना नियोजन गरजेचे असते, असे प्रतिपादन झेड.बी.पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एच. पवार यांनी केले.
झेड.बी. पाटील महाविद्यालयात जयहिंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे नुकतेच उदघाटन झाले. त्यावेळी प्राचार्य डॉ. पवार बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.ए.ए.पाटील, उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्य प्रा. व्ही.एस.पवार, प्रा. डॉ. सुरेंद्र मोरे, संयोजक प्रा.डॉ.प्रविणसिंग गिरासे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ.पवार पुढे म्हणाले की विद्यापीठाच्या नियमित अभ्यासाबरोबरच नियोजन करुन स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात करणे गरजेचे आहे.स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी ध्येय निश्चित करुन नियोजन पुर्वक सातत्यपूर्ण कठोर परिश्रमाची घेणे गरज असते. जीवनात प्राप्त परिस्थितीत स्वत:च्या विकासासाठी स्वत:च परिश्रम घ्यावे लागते.टीव्ही तसेच मोबाईल यांच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती बुडू लागली असून युवकांचा कुटूंबातील तसेच समाजातील संवाद संपत चालला आहे. अभ्यासासोबत जाणीवपूर्वक चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे असे सांगून विद्यार्थी दशेत शिस्त, सहनशीलता व नम्रता अंगी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जयहिंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ. प्रविणसिंग गिरासे यांनी यावेळी प्रास्ताविक करतांना केंद्राचा उद्देश, नियोजन, वेळापत्रक, तसेच प्रवेश प्रकिया याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली, सुत्रसंचालन प्रा.प्रियंका निकुंभ यांनी केले.