कामात दुर्लक्ष; बीडीओंसह ग्रामसेवकांना हटकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 10:56 PM2019-02-21T22:56:53+5:302019-02-21T22:57:58+5:30
अपमानास्पद वागणूक देणाºया अधिकाºयांच्या विरोधात घोषणा बाजी
शिरपूर : येथील तहसिल कार्यालयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आढावा बैठकीत ग्रामसेवकांनी कामकाजाकडे दुर्लक्ष करीत कामे समाधानकारक नसल्यामुळे चक्क प्रांताधिकाऱ्यांनी सुरूवातीला उपस्थित ग्रामसेवकानंतर काही वेळानंतर बीडीओंना देखील अपमानास्पद बोलून बैठकीतून बाहेर काढल्याची घटना घडली़ तसेच ग्रामसेवक संघटनेने घटनेचा निषेध करीत अपमानास्पद वागणूक देणाºया अधिकाºयांच्या विरोधात घोषणा बाजी केली़ या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे़
२१ रोजी दुपारी ४ वाजता येथील तहसिल कार्यालयात प्रांताधिकारी विक्रम बांदल यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची आढावा बैठक बोलविण्यात आली होती़ या बैठकीत तहसिलदार चंद्रशेखर देशमुख यांच्यासह बीडीओ वाय़डी़शिंदे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी आदी उपस्थित होते़
सुरूवातीला ग्रामसेवकांचा आढावा प्रांताधिकारी बांदल हे घेत असतांना ग्रामसेवकांनी असमाधानकारक कामे केल्यामुळे नाराजी व्यक्त करीत अपमानास्पद शब्द वापरले़ त्यावेळी ग्रामसेवक संघटनेचे सचिव हेमंत सोनार या संदर्भात माहिती देण्यासाठी उभे राहिले असतांना त्यांना या योजनेची चांगली कामे केली नसल्याचे सांगत प्रांताधिकाºयांनी अरेरावी व दमबाजी करत बैठकीतून त्यांना बाहेर काढले़ त्यामुळे उपस्थित इतर ग्रामसेवकांनी देखील या बैठकीला हाळताळ फासत बाहेर पडले़ बाहेर पडल्यावर संबंधित अधिकाºयांच्या अपमानास्पद कामाबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांच्या विरोधात गेटवर घोषणाबाजी केली़ ग्रामसेवकांपाठोपाठ बीडीओंशी देखील अपमानास्पद भाषा वापरीत त्यांना देखील बाहेर काढण्यात आले.
या संदर्भात ग्रामसेवक संघटनेने जिल्हाधिकारी व येथील पोलीस ठाण्यात निवेदन देवून या घटनेची गंभीर दखल घेवून तात्काळ चौकशी करावी. जोपर्यंत ग्रामसेवक संघटनेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शिरपूर तालुका ग्रामसेवक संघटना कामकाज थांबवित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर ग्रामसेवक संघटनेचे उपाध्यक्ष हिरालाल पावरा, कार्याध्यक्ष सी़बी़ पवार, सचिव हेमंत सोनार यांच्या स्वाक्षºया आहेत़ निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व राज्य ग्रामसेवक युनियन यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत़ या वादामुळे शेतकºयांचे नुकसान संभवते. त्यामुळे साºयांचे लक्ष लागले आहे.
तर वरिष्ठांकडे तक्रार करू : शिंदे
प्रांताधिकारी बांदल यांनी २१ रोजी संध्याकाळी ४़४२ वाजता बीडीओ वाय़डी़शिंदे यांना कॉल करून बैठकीला बोलाविले़ मात्र या संदर्भात बीडीओंना लेखीपत्र नव्हते. केवळ वरिष्ठ अधिकाºयांनी बोलविल्याने ते बैठकीला गेले़ ते आढावा घेत असतांना ग्रामसेवकांनी कामे केली नाहीत, त्यांच्या टक्केवारी कमी आहे सांगितले़ मात्र तहसिलदार व तलाठ्यांनी मोठ-मोठी गावे वा जास्त खातेदार संख्या असलेली गावांची कामे ग्रामसेवकांकडे सोपविली़ लहान गावे मात्र तलाठ्यांनी घेतल्यामुळे त्यांचे कामकाज झाले़ परंतु वाघाडी गावात १४५० शेतकरी सभासद संख्या असतांना देखील ८८२ शेतकºयांचे अर्ज गोळा केले़ तसेच तलाठ्यांनी वेळेवर याद्या उपलब्ध करून दिल्या नाहीत़ ३ दिवसापूर्वी याद्या दिल्यात अन् आज काम पूर्ण करण्याची अपेक्षा करतात़ तलाठी खैरनार यांनी देखील महिला ग्रामसेवेकेशी हुज्जत घातली आहे़ वेळोवेळी प्रांताधिकारी दमबाजीची भाषा करीत असतील तर त्यांच्या विरोधात वरिष्ठाकडे तक्रार केली जाईल, असेही शिंदे म्हणाले.