धुळे महापालिका उभारणार १ कोटी रूपयांचे नवीन संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:12 PM2018-02-28T17:12:32+5:302018-02-28T17:12:32+5:30
स्थायी समितीच्या सभेत मंजूरी, २४ गाळेधारकांचे होणार पुनर्वसन
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम शाळा क्रमांक एकच्या जागेत सुरू आहे़ या इमारतीच्या शेजारी असलेल्या गुजराथी शाळेच्या जागेत १ कोटी २८ लाख रूपयांच्या खर्चातून नवीन संकुल उभारले जाणार आहे़
महानगरपालिकेच्या नवीन इमारतीचे काम शाळा क्रमांक एकच्या जागेत जवळपास पूर्णत्वास आले आहे़ मात्र या इमारतीसमोर मनपा संकुलातील २४ गाळे अस्तित्वात असून त्यांच्या कराराची मुदत २०२२ पर्यंत आहे़ परंतु नवीन इमारतीला संरक्षण भिंत व प्रवेशव्दारे उभारण्यासाठी संबंधित गाळे जमिनदोस्त केले जाणार आहे़ त्यामुळे संबंधित गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशाकीस इमारतीलगत असलेल्या मनपाच्या गुजराथी शाळेच्या जागेत नवीन संकुल उभारले जाणार आहे़ गुजराथी शाळा सद्यस्थितीत मोडकळीस आली असून त्याठिकाणी एकही विद्यार्थी नाही़ त्यामुळे शाळेच्या जागेत नवीन सि़स़नं़ ३४७८ येथे नवीन संकुल उभारले जाणार आहे़ त्यासाठी बुधवारी स्थायी समितीच्या सभेत १ कोटी २८ लाख ३६ हजार ४६३ रूपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली़ महापालिका निधीतून संबंधित खर्च केला जाणार असून त्यासाठी गाळेधारकांचे देखील आर्थिक सहकार्य घेतले जाणार असल्याची माहिती अभियंता कैलास शिंदे यांनी स्थायी समितीच्या सभेत दिली़