प्रेमभंगातून नवविवाहितेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 04:40 PM2019-03-25T16:40:31+5:302019-03-25T16:42:40+5:30
शिरपुरातील घटना : मारेकरी प्रियकरानेच दिली युवतीच्या आईला माहिती, लग्नाच्या तिस-याच दिवशी लॉजमध्ये गळा दाबला
लोकमत आॅनलाईन
शिरपूर : अवघ्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या लग्नाची हळदही न फिटलेल्या नवविवाहितेचा तिच्या प्रियकराने गळा दाबून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी शहरातील फाटा परिसरातील संगीता रेसिडेन्सी पार्कमध्ये उघडकीस आली. विशेष म्हणजे खून करणा-या प्रियकराने युवतीच्या आईला दूरध्वनी करून आपण तिला जीवे ठार मारले, असे सांगितले. या घटनेमुळे युवतीचे कुटुंबीय हादरून गेले. या बाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे तातडीने घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी प्राथमिक माहिती घेत पंचनामा सुरू केला.
तालुक्यातील जातोडा येथील रेणुका धनगर (२२) या युवतीचे २३ मार्च रोजी चोपडा येथील तरुणाशी विवाह झाला होता. तिचे शिरपुरातील नरेंद्र एकनाथ भदाणे उर्फ पप्पू शेटे याच्याशी लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. तिच्या विवाहातही शेटे उपस्थित होता. रविवार २४ रोजी रेणुका येथे माहेरी आली. सोमवारी सकाळी पप्पू शेटे याने तिला दूरध्वनी करून शिरपूर शहरात बोलवून घेतले. तिने शिरपूर येथे येताना मोबाईल घरी जातोडा येथेच ठेवला. सकाळी ९ वाजताच ती येथे पोहचली. ती व शेटे यांनी शिरपूर फाट्याजवळील संगीता रेसीडेन्सी पार्क या लॉजमध्ये रूम घेतली. तेथेच पप्पूने रेणुकाचा गळा दाबून खून केला.
यानंतर त्याने लॉजच्या बाहेर येऊन रेणुकाच्या मोबाईलवर कॉल करून तिच्या आईला तुम्ही माझा रेणुकाशी विवाह होऊ दिला नाही, म्हणून मी तिला मारले. आता मी स्वत:ही आत्महत्या करत असल्याचे सांगून रेणुकाचा मृतदेह संगीता रेसीडेन्सी लॉजवर असल्याची माहिती दिली.
या मुळे रेणुकाचे कुटुंबीय पुरते हादरून गेले. तिच्या आईने हंबरडाच फोडला. थोड्याचवेळात ही घटना कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात माहिती झाली. तेथूनच कोणीतरी शिरपूर पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली.
येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे तत्काळ सहका-यांसह सदर लॉजवर पोहचले. तेथील एका खोलीत रेणुकाचा मृतदेह त्यांना आढळला. तिच्या अंगावरील हळद, नवी साडी, पायातील नवी चप्पल हे सर्व ती नववधू असल्याची साक्ष देत होते. दरम्यान रेणुकाचे नातलगही तेथे पोहचताच या सर्व प्रकाराचा उलगडा झाला. पोलिसांनी तत्काळ त्या दिशेने तपास सुरू केला असून मारेकरी असलेल्या पप्पू शेटे याचा तपास केला जात आहे. दरम्यान उशीरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संध्याकाळपर्यंत मारेक-याचा शोध लागलेला नव्हता.