दुसया दिवशी ८ उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 10:29 PM2019-09-04T22:29:42+5:302019-09-04T22:30:00+5:30
शिंदखेडा : रहिमपुरे येथील लाभार्थ्यांचे घरकुलासाठी पंचायत समिती आवारात आंदोलन
शिंदखेडा : तालुक्यातील रहिमपुरे येथील २८ लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी मंगळवारपासून पंचायत समितीच्या आवारात सरपंच व कुटुंबियांसह उपोषण सुरु केले आहे. बुधवारी दुपारी या उपोषणकर्त्यांपैकी ८ जण थंडी, ताप व चक्कर उलटीच्या त्रासाने हैराण झाले. वास्तविक हा विषय तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतला असूनही कुणी अधिकारी उपोषणस्थळी फिरकले नसल्याची खंत लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
सरपंच दिनेश बेडसे व घरकुल लाभार्र्थींसह त्यांचे कुटुंबिय असे ४० महिला व पुरुष पंचायत समिती आवारात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. बुधवारी दुपारी आक्काबाई प्रकाश रामराजे या महिलेला थंडी, ताप होता. अंगावर दोन गोधडी टाकूनही सदर महिला थंडीने अक्षरश: व्याकुळ झाली. त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी १०८ क्रमांकावर फोन केला. मात्र, रुग्णवाहिकाही लवकर आली नाही. त्यामुळे पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी सायंकाळी ५.२५ वाजता सरपंच दिनेश बिºहाडेंच्या मदतीने त्यांना तहसील कार्यालयाच्या वाहनात बसविले. त्यानंतर १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका आली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती जास्तच बिघडल्याने व रक्तदाब वाढलेला असल्याने त्यांना तातडीने धुळे येथे हलविण्यात आले. दरम्यान, उपोषणकर्ते प्रमिलाबाई संजय बैसाणे, राजेंद्र झुलाल रामराजे, लालदास ओंकार जाधव, महेंद्र बाबुलाल रामराजे, भाऊराव मंगा निकुंभे, विनोद बाबुराव रामराजे, झुलाल महारु रामराजे व ७ ते ८ लहान मुले- मुली यांनाही थंडी, ताप, उलटी, चक्कर येणे, असे त्रास जाणवू लागले. उपोषणकर्त्यांसाठी रात्री पंचायत समितीकडून गाद्या व लाईटची सोय करण्यात आली होती. मात्र, डास, मच्छरांमुळे अनेकांच्या अंगावर सुज आली आहे.
दरम्यान, दिवसभरापासून सर्व उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याने तहसील कार्यालयाला याबाबत माहिती दिली. मात्र, कोणीच आले नाही. तसेच डॉक्टरांनाही सूचित केले नसल्याने मलाच उपोषणकर्त्यांना दवाखान्यात घेऊन जावे लागत असल्याचे सरपंच बिºहाड़े यांनी सांगितले.